भारतातील 'या' राज्यात पेट्रोल 170 Rs लिटर तर सिलेंडर 1800 रुपयांना! जाणून घ्या नेमकं कारण काय

Manipur Petrol and LPG Price Hike: या ठिकाणी 900 रुपयांना मिळणाऱ्या तांदळाच्या गोणीची किंमत 1800 झाली आहे. तर अंडी, कांदे, बटाटे यासारख्या अत्यावश्यक गोष्टींचे दरही जवळजवळ दुप्पटीने वाढले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 25, 2023, 04:39 PM IST
भारतातील 'या' राज्यात पेट्रोल 170 Rs लिटर तर सिलेंडर 1800 रुपयांना! जाणून घ्या नेमकं कारण काय title=
Petrol At Rs 170 Per Litre

Manipur Petrol and Gas Price Hike: ईशान्येकडील महत्त्वाचं राज्य असलेल्या मणिपुरमध्ये मोठं आर्थिक संकट निर्माण झालं आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या ईशान्येकडील राज्यात झालेल्या हिंसेमुळे (Manipur Violence) राज्य आता आर्थिक संकाटात असून याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. राज्यातील आर्थिक संकटामुळे राज्याच्या बाहेरुन येणाऱ्या वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे राज्यातील रोजच्या वापरातील गोष्टींच्या किंमती दुप्पटीहून अधिक वाढल्या आहेत. मणिपुरमधील अनेक ठिकाणी स्वयंपासाठी वापरला जाणारा सिलेंडर, पेट्रोल, बटाटे, आंडी आणि तांदळासारख्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत.

अंड्यांच्या किंमतीही वाढल्या

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना राज्यातील शालेय शिक्षिका असलेल्या मांगलेम्बी चनम यांनी दिली. "आधी तांदळाची 50 किलोची गोण 900 रुपयांना मिळायची आता तिचीच किंमत 1800 रुपये झाली आहे. तसेच कांद्या बटाट्यांचे दरही 20 ते 30 रुपयांनी वाढले आहेत. राज्याच्या बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची किंमत वाढली आहे," असं चनम सांगतात. "अंड्यांची किंमतही वाढली आहे. आधी 30 अंड्यांचं कॅरेट 180 रुपयांना मिळायचं आता तेच 300 रुपयांना मिळतं," असंही चनम म्हणाल्या. तसेच सुरक्षादलांच्या देखरेखीखाली अत्यावश्यक वस्तुंचा साठा करण्यात आल्याने किंमती मर्यादीत असल्याचं चनम म्हणाल्या. यावर सुरक्षा दलांची देखरेख नसती तर हे दर अनेक पटींनी वाढले असते असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला. बटाट्याचे दर 100 रुपये प्रती किलोपर्यंत वाढले आहेत.

गॅसचे दरही वाढले

राज्यात इंधनाच्या दरांचाही भडका उडाला आहे. एका गॅस सिलेंडरची किंमत 1800 रुपयांहून अधिक झाली आहे. अनेक ठिकाणी पेट्रोल 170 रुपये लीटरहून अधिक झाली आहे. मणिपूरमधील ज्या जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला नाही त्याठिकाणी दरांमध्ये विशेष फरक पडलेला नाही. मात्र हिंसाचार घडलेल्या जिल्ह्यांमधील अत्यावश्यक गोष्टींचे दर फारच वाढले आहेत. तमेंगलॉन्ग जिल्ह्यात राशनचे दुकान चालवणाऱ्या रेबेका गंगमेई यांनी, "तांदळासारख्या अत्यावश्यक गोष्टींची किंमत फारच वाढली आहे. आमच्या जिल्ह्यात हिंसाचार झाला नसूनही दर वाढले आहेत. केवळ मांसांची किंमत आहे तशीच आहे. कारण मांसं हे इतर राज्यांमधून आयात केलं जात नाही," असं सांगितलं.

नेमकं घडलं काय होतं?

मैती समाजाला शेड्यूल ट्राइब (एसटी) दर्जा देण्याची मागणी केली जात आहे. याच्याविरोधात 3 मे रोजी इम्फाळमध्ये ट्रायबल सॉलिडॅरिटी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर मैती आणि कुकी समाजात हिंसक संघर्ष झाला. या हिंसेमध्ये 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आल्याने वाहतुकही बराच काळ ठप्प झाली होती. मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाल्याने ट्रकच्या वाहतुकीवर परिणाम झाला. म्हणूनच राज्याच्या बाहेरुन येणाऱ्या गोष्टींचा तुटवडा निर्माण झाला. याचा सर्वात मोठा फटका इम्फाळ वेस्ट जिल्ह्याला बसला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर आणि पॅरा मिलेट्रीच्या 10 हजार जवानांना तैनात करण्यात आलं आहे.