पणजी : कर्करोगाने ग्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर अतिशय साधे होते. एक नेता कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. ६३ वर्षाच्या कार्यकाळात ते ४ वेळा गोव्याचे मुख्यमंत्री होते. पण एकदाही ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करु शकले नाही. मनोहर पर्रिकर १९९४ मध्ये राजकारणात आले. भाजप उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. पणजी विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर १९९९ पर्यंत ते गोवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होते. १९९९ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुका झाल्या. राज्यात भाजपला ४० पैकी १० जागा मिळाल्या. यानंतर गोवा पीपल्स काँग्रेसने सरकार स्थापना केलं पण हे सरकार फक्त वर्षभर टिकलं. यानंतर २ अपक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे २ आमदारांच्या पाठिंब्याने गोव्यात सरकार स्थापन केलं.
२४ नोव्हेंबर २००० रोजी मनोहर पर्रिकर गोवाचे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांचा पहिला कार्यकाल २७ फेब्रुवारी २००२ पर्यंत कायम राहिला. २००२ मध्ये गोवाच्या तत्कालीन राज्यपाल मोहम्मद फजल यांना विधानसभा बरखास्त केली. त्यानंतर राज्यात निवडणुका झाल्या.
५ जून २००२ रोजी दुसऱ्यांदा मनोहर पर्रिकर गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पण यावेळीही ते आपला कार्यकाल पूर्ण करू शकले नाही. २९ जानेवारी २००५ ला ४ भाजप आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतर पर्रिकर सरकार अल्पमतात आलं. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर काँग्रेसचे प्रतापसिंह राणे गोव्याचे मुख्यमंत्री झाले.
गोव्यात २००७ मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा दिगंबर कामत यांच्या नेतृत्वात काँग्रेस पराभूत झाली. पाच वर्ष ते विरोधी पक्षनेते होते. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वात पुन्हा सत्ता स्थापन केली. ४० पैकी २१ जागा भाजपला मिळाल्या. २०१४ मध्ये देशात मोदी सरकार आल्य़ानंतर भाजपने पर्रिकरांना केंद्रात बोलावलं. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि देशाचे संरक्षणमंत्री झाले. यावेळी देखील त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही.
२०१७ गोवा विधानसभेची निवडणूक झाली. पण भाजपला बहुमत मिळालं नाही. इतर पक्षांनी पर्रिकर पुन्हा मुख्यमंत्री होतील तरच पाठिंबा देऊ अशी अट ठेवल्याने त्यांना संरक्षणमंत्रीपद सोडवं लागलं आणि पुन्हा ते मुख्यमंत्री झाले. काँग्रेसला राज्यात सर्वाधिक १७ जागा मिळाल्या होत्या तर भाजपला १३ जागा मिळाल्या होत्या. गोवा फॉरवर्ड पक्षा आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या पाठिंब्याने राज्यात पुन्हा भाजप सरकार स्थापन झालं. पण गेल्यावर्षी पर्रिकरांचं आरोग्य ढासाळलं. एक वर्षानंतर रविवारी त्यांचं निधन झालं. चौथ्यांदा देखील त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला नाही.