नवी दिल्ली : जम्मू काश्मीर सध्याच्या परिस्थितीवरून पीडीपी अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी रविवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महबूबा मुफ्ती यांनी आर्टीकल 35 ए आणि कलम 370 संदर्भात केंद्र सरकार जे करु पाहत आहे त्याचे परिणाम वाईट होतील. सरकारने जम्मू काश्मीर संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी. इथे नक्की काय होतंय याबद्दल आम्हाला कोणी काहीच सांगत नसल्याचे त्या म्हणाल्या.
जम्मू काश्मीरवर आज जी परिस्थिती ओढवली आहे ती याआधी कधीच नव्हती. सीमेवर जे होतंय त्यामुळे नागरिकांचे जीव जात आहेत. क्लस्टर बॉम्बचा उपयोग होत आहे. अशा प्रकारच्या कारवाया इस्त्रायल करते. माहीत नाही काय सुरु आहे. फुटीरतावाद्यांसोबत जे करायचे होते ते केलेच. आता मुख्य प्रवाहातील पक्षांविरोधातही भ्रष्टाचाराचे हत्यार बनवले जात असल्याचे त्या म्हणाल्या.
भाजपच्या प्रमुख नेत्यांची वक्तव्ये आणि खोऱ्यातील सुरक्षा दलांची मोठ्याप्रमाणावर केलेली जमवाजमव पाहिली तर कोणत्याही काश्मिरी नागरिकाच्या मनात शंका निर्माण होऊ शकते. केंद्रीय सुरक्षा दलांकडून राज्यातील पोलीस दलापासून काही गोष्टी लपवल्या जात आहेत. या सर्व घडामोडी पाहता केंद्राने काश्मीरमध्ये काहीतरी मोठी योजना आखल्याचे सूचित होत असल्याचे मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटले.
काश्मीरमध्ये सैन्याच्या हालचाली वाढल्या असून २८० तुकड्या काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्र लष्कर आणि वायूदलालाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये नक्की काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.