नई दिल्ली: Milk Price Hike:सर्वसामान्यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसू शकतो. अमूल दुधाच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन, दळणवळण आणि पॅकेजिंग खर्चात वाढ झाल्यामुळे अमूल दुधाच्या किमती पुन्हा एकदा वाढू शकतात, असे अमूल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. मात्र, यावेळी दर किती वाढणार हे त्यांनी स्पष्ट केले नाही. याआधी 1 मार्च 2022 रोजी अमूलने दुधाच्या दरात 2 रुपयांनी वाढ केली होती.
अमूलचे एमडी आरएस सोढी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, येथून किंमती कमी होऊ शकत नाहीत, परंतु वाढतील. सोढी म्हणाले की, सहकारी संस्थेने गेल्या दोन वर्षांत अमूल दुधाच्या किमतीत आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. यात गेल्या महिन्यात दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढ झाली आहे. सोधी यांच्या म्हणण्यावरून येत्या काळात अमूल दुधाचे दर वाढू शकतात हे स्पष्ट झाले आहे.
. सोधी म्हणाले, ''अमूल आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राने केलेली वाढ इतरांच्या तुलनेत खूपच मर्यादित आहे.दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो''
वीज, इंधन दळणवळणाच्या किंमती जास्त वाढल्या आहेत. ज्यामुळे कोल्ड स्टोरेजच्या खर्चावर परिणाम होतो. लॉजिस्टिक्सचा खर्चही वाढला आहे. यामुळे मार्चमध्ये दुधाच्या दरात प्रतिलिटर 1.20 रुपयांची वाढ झाली आहे.
सोधी म्हणाले की, महामारीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रतिलिटर 4 रुपयांनी वाढले आहे. त्याचबरोबर अनेक अडचणींमुळे कंपनीचा नफा कमी झाला आहे. परंतु नफावसुली हे सहकारी संस्थेचे मुख्य उद्दिष्ट नसल्यामुळे अमूल अशा दबावांना घाबरत नाही.
अमूलला मिळणाऱ्या एक रुपयापैकी 85 पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जातात. म्हणजेच अमूलच्या नफ्यात सर्वाधिक वाटा शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आला आहे.