Viral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?

Bihar Viral News: रहस्यमयरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 14, 2023, 04:43 PM IST
Viral News: वडिलांना वाटलं देवाघरी गेला, तो पाच महिन्यांनंतर मोमोज खाताना सापडला, काय घडलं नेमकं?  title=
missing son found in noida eating momos after five month

Missing Man Found Eating Momos: बिहारच्या भागलपूरमध्ये एक आश्चर्यचकित करणारी घटना (Bihar Viral News) समोर आली आहे. बेपत्ता झालेल्या मुलाच्या वडिलांनी त्याच्या सासरच्या मंडळींवर मुलाची हत्या व अपहरण केल्याचा आरोप केला होता. मुलाचा खूप शोध घेतल्यानंतरही तो सापडला नाही. त्याचा मृत्यू झाल्याची भीती त्याच्या कुटुंबीयांना वाटली. पण रहस्यरित्या बेपत्ता झालेला मुलगा पाच महिन्यांनंतर दिल्लीतील नोएडा येथे मोमोज खाताना सापडला आहे. बिहारमधून गायब झालेला तरुण नोएडामध्ये कसा गेला, हे कोडं मात्र अद्याप सुटलं नाहीये. 

एका वृत्तानुसार, बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव निशांत आहे. त्याचे वय ३४ असून तो ३१ जानेवारी २०२३पासून बेपत्ता आहे. तरुण मुलगा घरातून बेपत्ता झाल्यानंतर घरात एकच गोंधळ निर्माण झाला. घरातील सदस्यांनी खूप शोधाशोध करुनही तो सापडला नाही. तेव्हा त्याच्या वडिलांनी सुनेच्या कुटुंबीयांवर अपहरण व हत्येचा आरोप केला. २ फेब्रुवारी रोजी त्यांनी सुल्तानगंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी मुलाच्या सासरच्या लोकांनी त्याची हत्या केली असावी, अशी शंका उपस्थित केली होती. 

निशांतचा मेहुणा रविशंकर सिंह नोएडा इथे गेला होता. तेव्हा तिथे असलेल्या एका मोमोजच्या दुकानासमोर एक भिकारी दिसला. तो दुकानदाराकडे मोमोज मागत होता मात्र दुकानदार त्याला हटकत होता. निशांतच्या मेहुण्याने त्याला थांबवून मोमोज खायला दिले. त्यानंतर त्याने चौकशी केली. तेव्हा त्याने सांगितलेले नाव ऐकून त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. रविशंकर ज्याला भिकारी समजत होता तो त्याच्याच बहिणीचा नवरा निघाला. निशांतने ताबोडतोब फोन करत निशांत सापडल्याची माहिती त्याच्या घरच्यांना व बहिणीला दिली. 

निशांतचा पल्लवीसोबत एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर ते मुंबईत राहत होते. इथेच एका कंपनीत तो काम करत होता. तसंच, त्याने स्वतःच घरदेखील घेतलं होतं. पाच महिन्यांपूर्वी भावाच्या लग्नासाठी म्हणून त्याची पत्नी तिच्या माहेरी निघून आली होती. ३० जानेवारीला तिच्या भावाचे लग्न होते. निशांतसाठी तिच्या भावाने विमानाची तिकिटेदेखील पाठवून दिली होती. मात्र, अचानक ३१ जानेवारी रोजी निशांत सासरहून रहस्यमयरित्या बेपत्ता झाला होता. 

निशांत सापडताच त्याच्या मेहूणा त्याला घेऊन पोलिसांकडे घेऊन गेला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी निशांतला सुलतानगंज पोलिस ठाण्यात पाठवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत शारिरीक व मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे त्यांना जाणवले. तसंच, त्याचे अपहरण झालं होतं का किंवा तो बेपत्ता कसा झाला याची चौकशी पोलिस करणार आहेत.