नवी दिल्ली - फ्लिपकार्टच्या संस्थापकांनी राजीनामा दिल्यानंतर आता याचीच सहकारी कंपनी असलेल्या मिंत्रा आणि जबाँगचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनंत नारायणन यांनीही सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अन्यत्र संधी मिळाल्याने आपण राजीनामा दिला असल्याचे अनंत नारायणन यांनी स्पष्ट केले. मिंत्राकडून ही माहिती देण्यात आली. फ्लिपकार्टवर काही महिन्यांपूर्वीच वॉलमार्टने ताबा मिळवला आहे. मिंत्रा ही फ्लिपकार्टचीच ऑनलाईन फॅशन क्षेत्रातील सहकारी कंपनी आहे. अनंत नारायणन यांच्या राजीनाम्यानंतर आता फ्लिपकार्टच्या अमर नगरम यांच्याकडे मिंत्रा आणि जबाँगची जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वीच फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्या जाण्यानंतर अनंत नारायणन राजीनामा देतील, अशी चर्चा होती. अखेर ती खरी ठरली.
मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्या फ्लिपकार्टने काही महिन्यांपूर्वी आपल्या ताब्यात घेतल्या. तेव्हापासून अनंत नारायणन यांच्याकडे त्यांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आता मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून राजीनामा दिल्यानंतर ते हॉटस्टार ऑनलाईन स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्ममध्ये रुजू होण्याची शक्यता आहे. मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्यांना पुढे घेऊन जाण्यात अनंत नारायणन यांनी मोठी भूमिका बजावली होती, असे मिंत्रा आणि जबाँग या दोन्ही कंपन्यांनी काढलेल्या निवेदनात म्हटले आहे. अनंत नारायणन यांच्यामुळेच कंपनीने चांगली प्रगती साधली. त्याचबरोबर त्यांच्यामुळेच ही कंपनी ऑनलाईन व्यवसायात स्वतःचे स्थान टिकवून आहे, असेही कंपनीने म्हटले आहे.
अमर नगरम आधी फ्लिपकार्टसोबत होते. गेल्या सात वर्षांपासून ते याच कंपनीत कार्यरत आहेत. मोबाईलच्या माध्यमातून शॉपिंग ही संकल्पना देशात लोकप्रिय ठरविण्यात अमर नगरम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.