नवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?

२१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

Updated: Sep 20, 2017, 08:22 PM IST
नवरात्री २०१७: घटस्थापना कोणत्या मुहूर्तावर कराल ?  title=

  मुंबई : २१ सप्टेंबर २०१७ पासून यंदाचा शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत आहे.

पुढील नऊ दिवस आदिशक्तींचा जागर केला जाणार आहे. घरोघरी घटाची स्थापना करून त्याची पूजा केली जाते. तर सार्वजनिक मंडळांतर्फे देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.  
 राहुकाळ १ वाजून ३० मिनिटांपासून ३ वाजेपर्यंत असल्याने या काळात घटस्थापनेचा विधी केला जाऊ शकत नाही. 

 मग कोणत्या वेळेत कराल घटस्थापना ? 

सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपर्यंत आश्विन शुक्ल प्रतिपदा आहे. तोपर्यंत घटस्थापना करावी. जर कुणाला ते शक्य नसल्यास  दुपारी १२.३० पर्यंत घटस्थापना करण्यास हरकत नाही. अशी माहिती प्रख्यात पंचागकर्ते  दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.  

कशी केली जाते पूजा ? 

दोन पत्रावळींमध्ये परडी ठेवा. परडीत काळी माती घालून त्यात  सुगड ठेवा. त्यावर कुंकवाची पाच किंवा सात बोटे काढा. त्या सुगडाच्या तोंडावर नऊ विड्यांची पाने लावा. त्यावर एक नारळठेवा. त्या नारळाला देवीचा मुखवटा मानून हळद कुंकू लावण्याची प्रथा आहे. हार, वेणी, गजरा घालून सजवा.. घटा खालच्या काळ्या मातीत सात प्रकारची धान्य पेरा. नऊ रात्री सतत तेवत राहील असा नंदादीप लावा.  या घटावर फुलांच्या माळा सोडून सजावटही केली जाते. सकाळ-संध्याकाळ देवीची मनोभावे पूजा केली जाते. भक्ती केली जाते. उपासना केली जाते. शेवटच्या दिवशी घटावर आलेली लहान रोप स्त्रिया एकमेकींना देतात.