4 दिवसांचा होणार आठवडा? 13 राज्य अंमलबजावणी करण्यासाठी तयार

3 दिवस सुट्टी आणि 4 दिवस काम.... पगार वाढणार की कमी होणार?

Updated: Dec 20, 2021, 09:12 PM IST
4 दिवसांचा होणार आठवडा? 13 राज्य अंमलबजावणी करण्यासाठी तयार title=

नवी दिल्ली: केंद्र सरकार कामगार कायद्यांमध्ये नव्या वेतनासह काही बदल करण्याच्या तयारीत आहे. या कायद्याची नव्या वर्षात अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. चार कामगार कायदे आहेत ज्यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम कर्मचारी वर्गावर होणार आहे. 

सर्वात मोठा फायदा तर टेक होम सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होणार. तर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे PF मध्ये देखील बदल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. याच सोबत कामाचे तास देखील वाढण्याची शक्यता आहे. 

नव्या वर्षात पगार वाढणार असला तरी कामाचे तास आणि PF साठी जाणारे पैसे देखील वाढण्याची शक्यता आहे. 4 दिवसांचा आठवडा आणि तीन दिवस सुट्टी असा फॉर्म्युला आणण्याचा तयारीत आहेत. याबाबत सध्या विचार सुरू आहे. 

काय होणार महत्त्वाचे बदल

- यापुढं एकूण वेतनाच्या 50 टक्के मूळ वेतन असणार
- तर उर्वरित 50 टक्के वेतन हे भत्ते स्वरूपात मिळणार
- त्यामुळं पीएफ आणि ग्रॅच्युईटीची रक्कम वाढणार
- पण प्रत्यक्षात टेक होम सॅलरी कमी होण्याची चिन्हं आहेत
- नोकरी करणा-या प्रत्येकानं किमान आठवड्यात 48 तास काम केलं पाहिजे, असा नियम आहे.
- त्यानुसार दरदिवशी 8 तास काम केल्यास 6 दिवस काम आणि आठवड्याची 1 सुट्टी मिळते.
- त्याऐवजी आता दरदिवशी 12 तास काम करण्याचा नियम केला जाणार
- त्यामुळं 4 दिवस काम आणि 3 दिवस रजा असा बदल होणार

4 दिवसांचा आठवडा करण्यासाठी 13 राज्यांची तयारी आहे. केंद्र सरकारनं फेब्रुवारी महिन्यात या कायद्यांचे मसुदे अंतिम टप्प्यात आणले होते. 13 राज्यांकडून या संदर्भात हिरवा कंदील मिळण्याची शक्यता आहे. सर्व राज्यांनी हा कायदा एकाचवेळी लागू करावा या दृष्टीनं केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या नव्या वर्षात 4 दिवसांचा आठवडा देखील येण्याची शक्यता आहे.