काश्मीरमधील 'लेडी सिंघम', त्यांच्या प्रसिद्धीचं कारण काय?

सध्या काश्मीरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा चांगलाच बोलबाला आहे.  

Updated: Feb 7, 2020, 10:46 PM IST
काश्मीरमधील 'लेडी सिंघम', त्यांच्या प्रसिद्धीचं कारण काय?

श्रीनगर : सध्या काश्मीरमध्ये एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा चांगलाच बोलबाला आहे. त्या कुठेही गेल्या की नागरिक त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतात. आगे बढोच्या घोषणा देतात. कोण आहेत या लेडी सिंघम आणि काय आहे या प्रसिद्धीचे कारण ?

काश्मीरच्या बडगाममध्ये एकच चर्चा. तीही महिला पोलीस अधिकाऱ्यांची. एका पोलीस अधिकाऱ्याचे काश्मिरी तरूण जोरदार घोषणादेत स्वागत करत आहेत. त्यांचा जयजकार होतोय. कारण त्यांनी कामच तसे केले आहे. या आहेत बडगामच्या पोलीस उपाधीक्षक निलजा एंगमो. मुळच्या लडाखच्या असलेल्या निलजा डेप्युटेशनवर बडगामला आल्यात. काश्मीर खोऱ्यातील १५ ते २५ वयोगटातील तरुण मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी जात आहेत. याविरोधात त्यांनी मोहीम उघडली आहे. त्यांनी एकाच महिन्यात तब्बल १२ अमली पदार्थ तस्करांना गजाआड केले आहे. यामुळे बडगामचे नागरिक त्यांचे असे आभार मानत आहेत. 

छाया सौजन्य फेसबुक । Nilza Angmo

डीएसपी निलजा एंगमो आणि त्यांच्या सहकारी डीएसपी फराह निशात या दोन 'लेडी सिंघम'नी काश्मीर खोऱ्यातील ड्रग पेडलर्सवर पाश आवळलेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही त्यांच्या या कामगिरीचं कौतुक आहे. वरिष्ठच नव्हे, तर बडगामच्या जनतेनंही या कारवाईबाबत समाधान व्यक्त केले आहे. 

विशेष म्हणजे काश्मीर खोऱ्यातल्या ड्रग माफियांवर अंकूश आल्यानंतर दगडफेकीच्या घटनांमध्ये घट झाल्याचंही लक्षात आले आहे. ३७० हटवल्यानंतर काश्मीरला देशाच्या मुख्य प्रवाहासोबत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी काळ्या धंद्यांना आळा घालणे आवश्यक आहे आणि हे महत्त्वाचं काम निलजा आणि फराह करत आहेत.