निर्भयाच्या दोषींना फाशी कधी?

निर्भयाच्या आई आशादेवींनी संताप व्यक्त केला आहे.

Updated: Feb 1, 2020, 03:48 PM IST
निर्भयाच्या दोषींना फाशी कधी? title=

मुंबई : निर्भयाच्या दोषींची फाशी पुन्हा एकदा टळली. त्यांना फासावर लटकवलं जाईल, याची सगळा देश वाट बघत होता. मात्र पुन्हा एकदा कायद्याचा खेळ खेळला गेलाय. यावर निर्भयाच्या आई आशादेवींनी संताप व्यक्त केला आहे.

निर्भया बलात्कारातील चारही दोषींना फाशीची शिक्षा ठोठावूनही बरेच दिवस उलटून गेलेत. मात्र अद्याप निर्भयाचे बलात्कारी जिवंत आहेत. कायद्यातील पळवाटा शोधून कोर्टकचेऱ्यांचा असा काही खेळ मांडला गेलाय. आता १ तारखेला होणारी दोषींची फाशीही टळली आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने डेथ वॉरंट रद्द करून अनिश्चित काळापर्यंत फाशी पुढे ढकलली आहे.

सुप्रीम कोर्टाने फाशीवर शिक्कामोर्तब केलं असताना आणि केवळ एकाची दयायाचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित असताना इतर तिघांना फाशी द्यायला हवी होती. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पटियाला हाऊस कोर्टाला स्थगितीचा अधिकार आहे का, असा प्रश्नही यानिमित्तानं उपस्थित होतो आहे.

धक्कादायक बाब म्हणजे दोषींचे वकील ए पी सिंग यांनी आता फाशी अनंत काळापर्यंत टळल्याचं आव्हान दिल्याचा दावा निर्भयाच्या आई आशादेवी यांनी केला आहे. या देशात कायद्याचं राज्य आहे की नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

'लाख दोषी सुटले तरी चालतील, पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये', हा आपल्या न्याययंत्रणेचा पाया आहे. त्यामुळे न्याय मिळायला उशीर लागतो. पण एकदा न्याय मिळाला की त्याची अंमलबजावणी करण्यातही उशीर होत असेल, तर याला काय म्हणावं? जस्टीस डीलेड इज जस्टीस डिनाईड, हेदेखील लक्षात ठेवायला हवं.