बिहारमध्ये NDAला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील; नितीश कुमारांचा दावा

आम्ही एकत्रितपणे बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०० जागांवर विजय मिळवू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला. 

Updated: Mar 1, 2020, 05:47 PM IST
बिहारमध्ये NDAला २०० पेक्षा अधिक जागा मिळतील; नितीश कुमारांचा दावा title=

पाटणा: आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) २०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा दावा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला. ते रविवारी पाटणा येथे आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी नितीश कुमार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत संयुक्त जनता दल (जदयू) आणि NDAला मोठे यश मिळेल, असा अंदाज वर्तविला. संयुक्त जनता दल NDAच्या साथीने ही निवडणूक लढवेल. आम्ही एकत्रितपणे बिहार विधानसभेच्या २४३ पैकी २०० जागांवर विजय मिळवू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला. 

आमच्या सरकारच्या काळात बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारली. लोकसंख्येचा विचार करता आजच्या घडीला बिहार हे देशातील सर्वाधिक कमी गुन्हेगारी असलेले राज्य आहे, असेही नितीश यांनी सांगितले.

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल (राजद) यांच्यावरही नितीश यांनी टीकास्त्र सोडले. हे दोन्ही पक्ष अल्पसंख्याकांच्या उन्नतीचा विचार करतच नाहीत. त्यांना केवळ अल्पसंख्याकांची मते हवी असल्याचा आरोप नितीश यांनी केला. 

बिहारमध्ये चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि दिल्लीत भाजपला आलेल्या अपयशानंतर बिहारमध्ये सत्ता राखणे, भाजपसाठी प्रतिष्ठेचा मुद्दा झाला आहे. यामध्ये नितीश कुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. 

परंतु, नितीश कुमार यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणी(NRC) आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची (NPR) या मुद्द्यांवरून भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. बिहार विधानसभेत नुकताच या दोन निर्णयांविरोधात ठराव मंजूर करण्यात आला होता. तसेच नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (CAA) प्रश्नही न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याविषयी संयम बाळगायला हवा, असे मत नितीश कुमार यांनी व्यक्त केले होते. 

लोकसंख्या गणना करताना ती २०१०मधील पद्धतीप्रमाणेच व्हावी, असा नितीश यांचा आग्रह आहे. नागरिकांना त्यांच्या पालकांची जन्मतारीख आणि जन्म ठिकाण विचारण्यात येऊ नये, अशी नितीश कुमार यांची मागणी आहे.