ओडिशातल्या 'त्या' रेल्वे स्थानकावर आता थांबणार नाहीत ट्रेन; अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे तीन गाड्यांमधील भीषण धडक होऊन इतके दिवस उलटले तरी अपघाताच्या जखमा ताज्या आहेत. अपघातातील 82 मृतदेह अद्याप ओळखीच्या प्रतीक्षेत आहेत.

आकाश नेटके | Updated: Jun 10, 2023, 06:37 PM IST
ओडिशातल्या 'त्या' रेल्वे स्थानकावर आता थांबणार नाहीत ट्रेन; अधिकाऱ्यांनी सांगितलं कारण title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Odisha Train Accident : ओडिशाच्या (Odisha) बालासोर येथे  झालेल्या तिहेरी रेल्वे  भीषण अपघातात 275 जणांना जीव गमवावा लागला आहे. बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर (Bahanaga Bazar station) कोरोमंडल एक्सप्रेस, यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस आणि  मालगाडी यांच्यात धडक झाल्यानंतर हा अपघात झाला होता. अद्यापही या अपघाताच्या जखमा ताज्याच आहेत. अपघातानंतर इतक्या दिवसांनीही 82 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. दुसरीकडे भारतीय रेल्वेने (Indian Railway) बहनगा रेल्वे स्थानकावर रेल्वे न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थानकावर सध्या कोणतीही ट्रेन थांबणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यामागचे कारणही रेल्वेने सांगितले आहे.

ओडिशातील बहनगा बाजार स्थानकावर कोणतीही ट्रेन थांबणार नसणार असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण दुर्घटनेची केंद्रीय तपास यंत्रणा (CBI) तपास करत आहे. त्यामुळे आता सीबीआयने हे स्थानक पूर्णपणे सील केले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकाजवळ 2 जून रोजी दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा अपघात झाला होता. यात 275 लोकांचा मृत्यू झाला आणि 1,200 हून अधिक लोक जखमी झाले होते.

दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी आदित्य कुमार चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. "सीबीआयने लॉग बुक्स, रिले इंटरलॉकिंग पॅनेल जप्त केल्यानंतर स्टेशन सील केले असल्याने, चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतीही ट्रेन स्टेशनवर थांबणार नाही. बहनागा बाजार सारख्या लहान स्थानकांमध्ये, रिले इंटरलॉकिंग पॅनेल त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार सिग्नल, पॉइंट्स, ट्रॅक सर्किट्स, क्रॅंक हँडल, एलसी गेट्स, साइडिंग इत्यादींसाठी नियमांनुसार सूचित केले जातात," असे आदित्य कुमार चौधरी म्हणाले.

"स्थानकावरील सिग्नलिंग सिस्टमच्या सर्वात महत्त्वाच्या भागामध्ये कर्मचार्‍यांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी रिले इंटरलॉकिंग पॅनेल सील करण्यात आल्याने, पुढील सूचना मिळेपर्यंत कोणतीही प्रवासी ट्रेन किंवा मालगाडी बहनगा बाजार येथे थांबणार नाही," असेही चौधरी म्हणाले.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बहनगा बाजार रेल्वे स्थानकावरून दररोज 170 गाड्या जातात. यामध्ये भद्रक-बालासोर मेमू, हावडा भद्रक बाघजतीन फास्ट पॅसेंजर, खरगपूर खुर्द रोड फास्ट पॅसेंजर यासह केवळ 7 पॅसेंजर गाड्या या स्थानकावर दररोज एक मिनिट थांबतात. एका विशिष्ट दिवशी जवळपास 25 गावातील लोक पॅसेंजर ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनवर येतात. स्टेशनवर 10 पेक्षा कमी रेल्वे कर्मचारी काम करतात.