Omicron Variant Guidelines: कोरोनाचा नवीन प्रकार समोर आल्याने जगभरात चिंतेचं वातावरण आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनची (Omicron) प्रकरणं समोर आल्यानं भारताने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. केंद्र सरकारने सोमवारी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे (Guidelines) जारी केली आहेत. यानुसार, लसीकरण झालेलं असलं तरी संसर्गाचा धोका असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी अनिवार्य असणार आहे.
नव्या व्हेरिएंटचा धोका असलेल्या देशांमधून भारतात येण्यासाठी प्रवास करण्यापूर्वी 72 तास आधी COVID-19 चाचणी करावी लागेल. तसंच भारतात आल्यानंतर विमानतळावर पुन्हा कोव्हिड चाचणी करावी लागणार आहे. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या प्रवाशांसाना क्वारंटाईन केले जाईल आणि क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावर उपचार केले जातील.
याशिवाय, त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी देखील दिले जातील. निगेटिव्ह आढळलेल्या प्रवाशांना विमानतळ सोडण्यास परवानगी असेल, पण त्यांना 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. यानंतर, भारतात येण्याच्या 8 व्या दिवशी पुन्हा चाचणी केली जाईल, त्यानंतर 7 दिवस त्यांना सेल्फ मॉनेटरिंग करावं लागणार आहे.
ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने रविवारी एक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. 'ओमायक्रॉन' या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्राने रविवारी 'धोका असलेल्या' देशांमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. तसंच, चाचणीचा निकाल येईपर्यंत प्रवाशाला विमानतळ सोडू दिलं जाणार नाही. इतर देशातील प्रवाशांना विमानतळ सोडण्याची परवानगी असेल. पण या प्रवाशांनाही 14 दिवस सेल्फ मॉनेटरिंग करावं लागणार आहे.
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांपैकी पाच टक्के प्रवाशांची तपासणी केली जाईल तर संबंधित विमान कंपनीला प्रत्येक फ्लाइटमध्ये येणाऱ्या प्रवाशांपैकी गरज वाटणाऱ्या पाच टक्के प्रवाशांची तपासणी करावी लागेल.