close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

कुमारस्वामी सरकारला आणखी एक दिवस जीवदान

बंगळुरूमध्ये अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगलं आहे. 

Updated: Jul 18, 2019, 08:07 PM IST
कुमारस्वामी सरकारला आणखी एक दिवस जीवदान

बंगळुरु : कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये अभूतपूर्व राजकीय नाट्य रंगलं आहे. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी सकाळी विश्वासदर्शक ठराव मांडला खरा, मात्र त्यावर मतदान घेण्याचं त्यांनी टाळलं. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. राजीनामा दिलेल्या आमदारांना पक्षादेश बंधनकारक नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी म्हटलं असलं तरी याबाबत संदिग्धता असल्याचा दावा सिद्धरामय्यांनी केला. यावर आपल्याला विचार करायला आणि सल्ला घ्यायला वेळ हवा असल्याचं विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी म्हटलं. त्यावर रात्रीचे १२ वाजले तरी चालतील, पण ठरावावर आजच मतदान घ्या, अशी मागणी भाजपा गटनेते बी.एस. येडियुरप्पा यांनी केली.

राज्यपाल वजुभाई वाला यांनीही विधानसभा अध्यक्षांकडे आपला प्रतिनिधी पाठवून संध्याकाळपर्यंत मतदान घेण्याची विनंती केली. काँग्रेसचा मात्र तांत्रिक मुद्दा उपस्थित करून वेळ काढण्याच्या प्रयत्नात होता. दरम्याच्या काळात आणखी एका मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षांनी गोंधळ घातला. त्याचं झालं असं की विधानसभा भरताच काँग्रेसचे आमदार श्रीमंत पाटील गायब असल्याचं लक्षात आलं. छातीत दुखू लागल्यामुळे सकाळी ते रिसॉर्टवरून निघाले आणि उपचारासाठी मुंबईत आल्याचं सांगितलं गेलं.

बंगळुरू ते मुंबई एवढा प्रवास अस्वस्थ वाटत असताना पाटील यांनी कसा केला. अशी शंका उपस्थित झाली. त्यामुळे भाजपनंच पाटील यांना पळवल्याचा आरोप सत्ताधारी पक्षांनी विधानसभेत केला. एवढं करून ते थांबले नाहीत, तर पाटील यांचं विमानतळावरचं छायाचित्र दाखवण्यात आलं. भाजपाचे माजी आमदार लक्ष्मण सौदी यांच्यासोबत श्रीमंत पाटील जात असल्याचं या छायाचित्रात दिसतं आहे.