Parliament Breach: चार नाही सहा जण, सोशल मीडियावर भेटले... असा बनला 13 डिसेंबरचा प्लान

Parliament Security Breach Video : लोकसभेत घुसखोरी केल्याच्या घटनेने देश हादरला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. संसदेच्या आत आणि बाहेर अटक करण्यात आलेल्या आरोपींचा उद्देश एकच होता.

राजीव कासले | Updated: Dec 13, 2023, 07:36 PM IST
Parliament Breach: चार नाही सहा जण, सोशल मीडियावर भेटले... असा बनला 13 डिसेंबरचा प्लान title=

Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. मैसूरचे भाजप खासदार प्रताप सिन्हा यांच्या व्हिजिटर पासवर हे तरुण संसदेत शिरले. या प्रकरणी खासदार प्रताप सिन्हा यांचीही चौकशी केली जात आहे. 

सोशल मीडियावर ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व आरोपी एकमेकांना आधीपासून ओळखत होते. संसदेतल्या (Parliament Attack) आणि संसदेबाहेरच्या लोकांचा उद्देश एकच होता. हे सर्व आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती मिळतेय. त्यानंतर त्यांनी सूनियोजीत प्लान केला. लोकसभेत घुसखोरी करणाऱ्या आरोपींची नावं मनोरंजन आणि सागर शर्मा अशी आहेत. मनोरंजन मैसूर इथं राहाणारा आहे. तर संसदेबाहेर अटक करण्यात आलेल्या तरुणाची नावं अमोल शिंदे आणि तरुणीचं नाव नीलम असं आहे. अमोल शिंदे हा महाराष्ट्रात राहाणार आहे तर नीलम ही हिस्सारमध्ये राहाणारी आहे. दोघांकडे आधारकार्ड किंवा कोणतंही ओळखपत्र नव्हतं. आपण कोणत्याही संघटनेशी जोडले गेलेलो नाी, स्वत:हून संसदेत आल्याचं त्यांनी म्हटलंय.  त्यांच्या चौकशीसाठी पोलिसांचं एक विशेष पथक बनवण्यात आलं आहे. 

चार नाही तर सहा जण
संसद घुसखोरी प्रकरणात 6 जणांचा समावेश असल्याचं समोर आलंय. यातील 4 जणांना अटक करण्यात आलीय तर 2 जण फरार आहे. त्यांचा तपास यंत्रणांकडून शोध घेतला जातोय. विशेष म्हणजे यातील एक आरोपी मनोरंजन हा गेल्या 6 महिन्यांपासून संसदभवन परिसरात पासेस मिळवण्यासाठी फेऱ्या मारत होता. आता या सगळ्या आरोपींचा घुसखोरीमागचा नेमका उद्देश काय होता, याचा शोध पोलीस घेतायेत. अटक करण्यात आलेले चारही आरोपी गुरूग्रामच्या सेक्टर 7 मधील हाऊसिंग बोर्डात थांबले होते. या प्रकरणात हिस्सारमधील विक्की शर्मा आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आलीय. चौघेही विक्का शर्माच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येतीय. 

नीलमच्या भावाची प्रतिक्रिया
चार आरोपींपैकी नीलम या तरुणीच्या कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. नीलमच्या भावाने आपण ही घटना ऐकल्यानंतर हैराण झालो असल्याचं म्हटलंय. नीलम मोठी बहिण असून ती दिल्लीत गेल्याचं आम्हाला माहित नव्हतं, हिसारमध्ये ती शिक्षण घेत होती. मंगळवारी ती घरी आली होती, असं तिच्या भावाने सांगितलं. नीलमने बीए, एमए, बीएड आणि कॅट परीक्षा क्लालिफाय केली आहे. आपली बहिण नेहमीच बेरोजगारीच्या मुद्दयावर आवाज उठवत होती. शेतकरी आंदोलनातही तिने सहभाग घेतला होता. गेल्या 5 महिन्यापासून ती हिसारमध्ये रहात होती, पण ती दिल्लीला कधी आणि का गेली हे आम्हाला माहित नसल्याचंही तिच्या भावाने सांगितलं. नीलमच्या वडिलांचं मिठाईचं दुकान आहे, तर दोन भाऊ दुग्धव्यवसाय करतात.