Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...

Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 14, 2024, 11:37 AM IST
Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...  title=
धक्कादायक व्हिडीओ आला समोर

Dr Balaji Jagannath Attack Video: चेन्नईमधील रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका डॉक्टरवर तरुणाने चाकूने वार केले. त्यानंतर हा तरुण शांतपणे रुग्णालयाच्या लॉबीमधून चालत बाहेर जात असताना हा हल्ला पाहणाऱ्यांनी, 'त्याने वार केलेत' असा आरडाओरड केल्यानंतर सुरक्षारक्षकांनी या तरुणाला ताब्यात घेतलं. हा हल्ला झाल्यानंतरचा या तरुणाचा लॉबीमधून चालताना अंगावर काटा आणणारा व्हिडीओ काही तासांनी समोर आला आहे.

हल्ला झालेले डॉक्टर कोण? 

समोर आलेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचं नाव विग्नेश असं असून त्याने डॉक्टर बालाजी जगननाथ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. डॉक्टर बालाजी हे प्रसिद्ध ऑकोलॉजिस्ट आहेत. तसेच ते सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणारा कलाइग्नार सेंटेनरी सुपर स्पेशॅलिटी हॉस्पीटलमध्ये शिक्षक म्हणून ही काम करतात. डॉ. बालाजी हे विग्नेशच्या आईवर उपचार करत होते.

कपाळ, पाठ, पोटावर चाकूचे वार

वरिष्ठ डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर बालाजी यांना पेसमेकर लावण्यात आला आहे. हृदयाचे धोके नियंत्रित करण्यासाठी पेसमेकर वापरलं जातं. डॉक्टर बालाजी यांच्या कपाळावर, पाठीवर, कानामागे आणि पोटावर चाकूचे वार करण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तामिळनाडूचे आरोग्यमंत्री मा सुब्रमण्यम यांनी डॉक्टर बालाजी हे आयसीयूमध्ये असून त्यांची प्रकृती स्थीर आहे. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये डॉक्टरांवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर विग्नेशने हातातील चाकू खिडकीमधून टाकला आणि तो शांतपणे हॉस्पीटलच्या लॉबीतून चालत बाहेर जाऊ लागला. चाकू खाली टाकण्यापूर्वी त्याने त्यावरील रक्त पुसून घेण्याचा प्रयत्न केल्याचंही सांगितलं जात आहे.

आता तरी त्याला पकडा

विग्नेशच्या मागून चालणाऱ्या व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला आहे. व्हिडीओ रेकॉर्ड करणारी व्यक्ती विग्नेशने चाकू खाली फेकल्यानंतर रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना, "आता तरी त्याला पकडा" असं म्हणताना ऐकू येत आहे. आरोपीने "तुमची आई किंवा वडील अडचणीत असतील तर तुम्ही काय केलं असतं?" असं विचारल्याचं सांगितलं जात आहे. 'त्याने वार केलेत' असा आरडाओरड सुरु असतानाच सुरक्षारक्षकांनी विग्नेशला पकडलं. दरम्यान, गर्दीने विग्नेशला मारण्यास सुरुवात केली असता एक महिला मध्ये पडली आणि तिने विग्नेशला सोडवलं. त्यानंतर विग्नेशला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ...

का केला हल्ला?

 विग्नेशच्या आईला कॅन्सर झाला असून डॉक्टरांनी मुद्दाम आपल्या आईला चुकीची औषधं लिहून दिल्याची शंका आल्याने रागाच्याभरात तरुणाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. 

मुख्यमंत्र्यांचे आदेश

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ए. के. स्टॅलिन यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच असे हल्ले पुन्हा होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिलेत. "डॉक्टर करत असलेली सेवा ही फार महत्त्वाची असून त्यांची सुरक्षेची जबाबदारी आमची (सरकारची) आहे. अशाप्रकारेच हल्ले भविष्यात होऊ नये म्हणून सरकार सर्व काळजी घेईल," असं आश्वासन स्टॅलिन यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन दिलं आहे.