ICMR: तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूक; रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ?

ICMR: 2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 17, 2024, 08:13 AM IST
ICMR: तब्बल 45% डॉक्टर प्रिस्क्रिप्शन देताना करतायत चूक; रुग्णांच्या जीवाशी होतोय खेळ? title=

ICMR: इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने नुकतंच एक सर्व्हेक्षण केलं आहे. या सर्व्हेक्षणानुसार, सुमारे 45 टक्के डॉक्टर अपूर्ण प्रिस्क्रिप्शन लिहित असल्याचं समोर आलं आह. मुख्य म्हणजे ही बाब रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणारी आहे. आयसीएमआरच्या म्हणण्यानुसार, रुग्णांना वैद्यकीय सल्ला देणारे डॉक्टर घाई गडबडीत निष्काळजीकपणा करताना दिसतात. यावेळी 13 नामांकित सरकारी रुग्णालयांचे सर्वेक्षण करून आता हा निष्काळजीपणा रोखण्यासाठी केंद्र सरकार कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे.

13 रूग्णालयाच्या ओपीडींमध्ये केलं सर्व्हेक्षण

2019 मध्ये ICMR ने औषधांच्या वापरावर एक टास्क फोर्स तयार केला, ज्यांच्या देखरेखीखाली ऑगस्ट 2019 ते ऑगस्ट 2020 दरम्यान 13 रुग्णालयांच्या OPD मध्ये सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये दिल्ली एम्स, सफदरजंग हॉस्पिटल, भोपाळ एम्स, बडोदा मेडिकल कॉलेज, मुंबई जीएमसी, सरकारी मेडिकल कॉलेज, ग्रेटर नोएडा, सीएमसी वेल्लोर, पीजीआय चंदीगड आणि इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज, पाटणा या रूग्णालयांचा समावेश आहे. 

या रुग्णालयांमधून एकूण 7,800 रुग्णांच्या प्रिस्क्रिप्शनची माहिती घेण्यात आली. त्यापैकी 4,838 प्रिस्क्रिप्शन तपासणी करण्यात आली. यामधील 2,171 डॉक्टरांनी लिहिलेल्या चिठ्ठ्यांमध्ये त्रुटी आढळून आल्याचं समजलं. यावेळी धक्कादायक बाब म्हणजे 475, म्हणजे सुमारे 9.8% प्रिस्क्रिप्शन पूर्णपणे चुकीची लिहिल्याचं समोर आलं. यामध्ये असं आढळून आलं की, बहुतेक रुग्णांना पॅन्टोप्राझोल, राबेप्राझोल-डॉम्पेरिडोन आणि एन्झाइम औषधं घेण्याचा सल्ला देण्यात आला होता, तर अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन आणि उच्च रक्तदाब यासाठी दिलेली प्रिस्क्रिप्शन सर्वात चुकीची असल्याचं आढळून आलं.

जागतिक आरोग्य संघटनेचा महत्त्वाचा दावा

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) 1985 मध्ये तर्कशुद्ध पद्धतीने प्रिस्क्रिप्शनबाबत आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वं लागू केली. असं असूनही जगभरातील 50 टक्के औषधे रुग्णांना अयोग्य पद्धतीने दिली जातात. बहुतेक रुग्णांना माहित नसतं की, त्यांना कोणतं औषध कोणत्या समस्येसाठी दिले जातंय. याशिवाय हे औषधं आणखी किती दिवस घ्यायचं आहे. 

गेल्या 18 वर्षांपासून डॉक्टर करतायत प्रॅक्टिस

मिळालेल्या माहितीनुसार, ज्यावेळी प्रिस्क्रिप्शनची योग्य पद्धतीने पडताळणी केली त्यानुसार हे प्रिस्क्रिप्शन लिहिणारे सर्व डॉक्टर पदव्युत्तर आहेत. हे सर्व डॉक्टर चार ते 18 वर्षांपासून सराव करत असल्याचं समोर आलं होतं. प्रिस्क्रिप्शनमध्ये औषधाचा डोस, ते घेण्याचा कालावधी, किती वेळा घ्यायचे, औषधाचं फॉर्म्युलेशन काय आहे ही सर्व माहिती रुग्णाला दिली जात नव्हती.