अभिनंदन यांनी 'पाक'समोर लपवलेली माहीती मोदींनी प्रचार सभेत सार्वजनिक केली- कॉंग्रेस

 तामिळनाडूचे विंग कमांडर अभिनंदन यांचा मला अभिमान आहे. पूर्ण देश त्यांची वाट पाहत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. 

Updated: Mar 1, 2019, 05:12 PM IST
अभिनंदन यांनी 'पाक'समोर लपवलेली माहीती मोदींनी प्रचार सभेत सार्वजनिक केली- कॉंग्रेस  title=

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन भारतीय सीमेपर्यंत पोहोचले आहेत. काही वेळातच अटारी-वाघा बॉर्डरने ते भारतात येतील. अभिनंदन देशात पोहोचण्याआधीच त्यावर राजकारण होण्यास सुरूवात झाली आहे. कॉंग्रेस प्रवक्ता प्रियांका चतुर्वेदी यांनी शुक्रवारी ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारले आहे. 

पाकिस्तान आर्मीच्या ताब्यात गेल्यानंतर अभिनंदन यांना वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही कुठे राहता ? लग्न झाले आहे का ? असे ते प्रश्न होते. पण अभिनंदन यांनी काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. यामध्ये त्यांनी आपण भारतात कुठे राहतो हे त्यांनी जाणिवपूर्वक सांगितले नाही. पण त्याच वेळी भारतातील काही माध्यमांमध्ये अभिनंदन कुठे राहतात ? त्यांच्या घरी कोण कोण राहते ? याबद्दल माहिती देण्यात येत होती. तामिळनाडूतील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिनंदन बद्दल जनतेला संबोधित करत होते. तामिळनाडूचे विंग कमांडर अभिनंदन यांचा मला अभिमान आहे. पूर्ण देश त्यांची वाट पाहत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. यानंतर प्रियांका चतुर्वेदी यांनी एक ट्वीट केले आहे. 

विंग कमांडर पाकिस्तानच्या ताब्यात असूनही आपली माहिती त्यांना देत नाही आहेत. पण पंतप्रधान एका निवडणूक रॅलीमध्ये न अडखळता अभिनंदन यांच्या बद्दल माहिती देत आहेत असे प्रियांका यांनी म्हटले. 

तुम्ही भारतातल्या कोणत्या राज्यातून आहात ? असा प्रश्न अभिनंदन यांना पाकिस्तान आर्मीने विचारला. त्यावेळी मी हे सांगू शकत नाही पण मी दक्षिण भारतातून आहे असे उत्तर त्यांनी दिले. जिनिव्हा करारानुसार अशा स्थितीत जवानांकडे ठराविक माहिती न सांगण्याचा अधिकार असतो. विंग कमांडर अभिनंदन यांनी नेमके हेच केले. त्यांनी आपले नाव, बॅच नंबर या व्यतिरिक्त कोणतीही माहीती देण्यास नकार दिला. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावेही पंतप्रधानांकडे मागितले आहेत. पाकिस्तानच्या दहशतवादी कॅम्पवर करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकमध्ये 300 ते 350 दहशतवादी मारल्याचा दावा करण्यात येत आहे. पण प्रत्यक्षात तिथे एकही दहशतवादी मारला गेला नसल्याची शंका ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केली आहे.