President Draupadi Murmu: द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती आहेत. सोमवारी सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी त्यांना राष्ट्रपतीपदाची शपथ दिली. राष्ट्रपतीपदावर द्रौपदी मुर्मू या विराजमान झाल्यानंतर एक जुनी मुलाखत व्हायरल होत आहे. यात मुर्मू यांनी त्यांचं खरं नाव द्रौपदी नसल्याचा खुलासा केला आहे. द्रौपदी हे नाव शाळेतील शिक्षकाने दिल्याचं सांगितलं आहे. मुर्मू यांनी सांगितलं की, संथाली ही ओडिशासह काही राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. त्याचं संथाली नाव 'पुती' होतं. संथाली संस्कृतीत नाव एका पिढीकडून दुसऱ्या पीढीकडे जात असतं. जर कुटुंबात मुलीचा जन्म झाला तर आजीचं नाव दिलं जातं. तर मुलगा झाला तर आजोबांचं नाव दिलं जातं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सांगितलं की, "शाळेतील शिक्षकाला माझं नाव आवडलं नाही आणि त्यांनी चांगल्यासाठी माझं नाव बदललं. द्रौपदी हे नाव महाभारतातील पात्राचं नाव आहे. नवं नाव देणारे शिक्षक आमच्या जिल्ह्यातील नव्हते. माझं नाव 'दुरपदी' ते 'दोर्पदी'पर्यंत कित्येकदा बदललं गेलं."
1979मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी महिला कॉलेजमधून पदवी घेतली. त्यांची पहिली नोकरी होती राज्य सरकारच्या सिंचन विभागात. पण कारकुनीमध्ये मत रमलं नाही आणि त्या मयूरभंजमधील कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापिका झाल्या. 1997 साली त्यांच्या आयुष्याला मोठी कलाटणी मिळाली. त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि मयूरभंजच्या रंगरायपूर वॉर्डातून त्या नगरसेविका झाल्या. त्यानंतर 2 वेळा आमदार आणि 2000 ते 2004 या काळात ओडिशा सरकारमध्ये राज्यमंत्री झाल्या. 2015मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.