मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. खासदार आणि आमदार यासाठी मतदान करणार आहेत. एनडीएकडून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुर्मू यांना राष्ट्रपतीपदासाठी उमेदवारी देण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबत त्यांनी सांगितलं आहे.
मुर्मू यांनी त्यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्या भावुक झाल्या होत्या. त्यांनी त्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं हे सांगितलं. मुर्मू म्हणाल्या की, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सांगितले की एनडीएने राष्ट्रपतीपदासाठी तुमची उमेदवारी निश्चित केली आहे, तेव्हा त्यांनी सांगितले की मी एका छोट्या गावातून आहे. मी राष्ट्रपतीपदासाठी योग्य आहे का?
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, पंतप्रधानांना त्यांनी सांगितले की, 'तुम्ही मला देशाचे प्रथम नागरिक बनवण्याचा निर्णय घेतला आहे, इतकी मोठी जबाबदारी कशी पार पाडणार. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना प्रोत्साहन देत संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले. ही देशातील जनतेची शक्ती आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्यघटनेने दिलेली शक्ती आहे. संविधान त्यांना मार्गदर्शन करेल.'
द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, जेव्हा त्यांना राज्यपाल बनवण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच त्यांना झारखंडला पाठवत सांगितले की, गावोगावी जावून लोकांच्या समस्या ऐकून घ्या. द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की झारखंडमध्ये राज्यपाल म्हणून त्यांनी केलेले काम उत्कृष्ट असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्यामुळेच प्रथमच आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्यात आली.
झारखंडच्या माजी राज्यपाल आणि राष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्य़ा उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी एनडीए आणि भाजपच्या नेत्यांकडून एकमत निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. झारखंडमधील मुख्य सत्ताधारी पक्ष जेएमएमने अद्याप द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही, परंतु प्रथमच आदिवासी महिलेला देशाचे प्रथम नागरिक म्हणून प्रस्थापित करण्यासाठी जेएमएम आणि इतर पक्ष सहमत होतील अशी अपेक्षा आहे.