मुंबई : राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून उमेदवार उतरवण्याची तयारी सुरु असताना त्यांना आणखी एक धक्का बसला आहे. शरद पवार, फारुख अब्दुला यांच्यानंतर आता माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या नावाच्या चर्चेला ही पूर्णविराम लागला आहे.
जेडी(एस) नेते एच.डी. कुमारस्वामी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले की, त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक लढवणार नाहीत. ते म्हणाले की, 'JD(S) चे एकमेव उद्दिष्ट आहे की पक्षाने त्यांच्या हयातीत कर्नाटकात स्वतंत्र सरकार बनवले पाहिजे.'
एका प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी यांनी मला आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. आम्ही उपस्थित होतो. ज्या बैठकीत सुमारे 17 पक्ष सहभागी झाले होते, सर्वांनी आपले मत व्यक्त केले आहे.
कर्नाटकच्या माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, 20 जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या उमेदवाराचा निर्णय घेण्यासाठी आणखी एक बैठक बोलावली जाईल कारण मागील बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून देवेगौडा यांच्या नावाची चर्चा असताना ते म्हणाले की, 'नाही, देवेगौडा यांचे नाव शर्यतीत येण्याचा प्रश्नच नाही, त्यांना त्यात रस नाही. त्यांची इच्छा आहे की जेडी(एस) ने त्यांच्या हयातीत कर्नाटकात स्वतंत्र सरकार बनवायचे आहे, हेच त्यांचे ध्येय आहे.'
15 जून रोजी झालेल्या बैठकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या विरोधात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत संयुक्त उमेदवार उभे करण्यावर एकमत होण्यासाठी 17 विरोधी पक्ष उपस्थित होते. शरद पवार यांच्या नेतृत्वाच 20-21 जून रोजी पुन्हा मुंबईत बैठकी होणार आहे.
अनेक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी संयुक्त विरोधी उमेदवार होण्याचा आग्रह केला होता, परंतु त्यांनी ही ऑफर नाकारली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक 18 जुलै रोजी होणार आहे.