नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेहमीच वडिलांसारखं मार्गदर्शन केल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या कारकिर्दीवर आधारित एका छायाचित्रांच्या पुस्तकाचं पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. हे उद्गार काढताना मोदींचा गळा दाटून आला होता.
प्रणवदांनी गेल्या तीन वर्षात आपल्याला अनेकदा विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. प्रणव मुखर्जी हे नेहमीच एक प्रेरणादायी नेते राहिल्याचं यावेळी मोदींनी आवर्जून सांगितलं. यावेळी मुखर्जींनीही पंतप्रधान मोदींच्या कामाबद्दल समाधानाची भावना व्यक्त केली. मुखर्जी आणि मोदी यांच्यात व्यक्ती म्हणून मतभेद असले, तरी त्याचा पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्यातल्या संबंधांवर कधीही परिणाम होऊ दिला नाही असं मुखर्जींनी म्हटलं आहे.