close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

तीन तलाक, निकाह हलालासारख्या कुप्रथा नष्ट होणं गरजेचं - राष्ट्रपती

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती कोविंद यांनी निवडणूक आयोग आणि देशाच्या जनतेचे आभार मानले

Updated: Jun 20, 2019, 12:35 PM IST
तीन तलाक, निकाह हलालासारख्या कुप्रथा नष्ट होणं गरजेचं - राष्ट्रपती

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिभाषण केलं. सकाळी ११ वाजता राष्ट्रपतींचं संसदेत आगमन झालं. सरकारची पुढील पाच वर्षांची ध्येयधोरणं राष्ट्रपतींनी मांडली. 'सब का साथ सब का विकास' हा सरकारचा मूलमंत्र आहे, असं सांगत राष्ट्रपतींनी गुरुवारी संसंदेच्या सेंट्रल हॉलमधून दोन्ही सदनांना संयुक्तरित्या संबोधित केलं. सर्वसामान्यांना सक्षम करण्याचा सरकारचा निश्चय असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित होणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रपती कोविंद यांनी निवडणूक आयोग आणि देशाच्या जनतेचे आभार मानले. २०१९ च्या निवडणुकीत देशाच्या जनतेनं विकास यात्रा पुढे नेण्यासाठी मतदान केलं... नव्या लोकसभेत सर्वाधिक महिला खासदार निवडणूक आल्यात, असं राष्ट्रपतींनी यावेळी म्हटलं.

२०१४ मध्ये सरकारला पूर्ण बहुमत मिळालं होतं... २०१९ मध्ये विकासयात्रा पुढे नेण्यासाठी जनादेश मिळाल्याचं त्यांनी म्हटलं. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर उभं राहणाऱ्या जवानांच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करणं आपली जबाबदारी आहे. यासाठीच स्कॉलरशिप फंड वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलायच. यामध्ये पहिल्यांदाच राज्याच्या पोलिसांच्या मुलांचाही यात समावेश करण्यात आलाय, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

जगातील सर्वात जास्त स्टार्टअप असणाऱ्या देशांत भारताचा समावेश होतो. २०२४ पर्यंत देशात ५० हजारांहून अधिक स्टार्टअपचं लक्ष्य गाठण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. तसंच विकासाकडे वाटचाल करत असताना समाजातील तीन तलाक आणि निकाह हलाला यांसारख्या कुप्रथा संपवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. महिला सशक्तीकरण हे सरकारच्या प्राथमिकतांपैंकी एक असल्याचंही त्यांनी म्हटलं.

उल्लेखनीय म्हणजे, राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरच संसदेच्या सत्राची कार्यवाही सुरु होते. ५ जुलै रोजी मोदी सरकारचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला जाईल. 

दरम्यान, आज संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांसाठी मेजवानीचं आयोजन केलं आहे. पंतप्रधानपदी दुसऱ्यांदा निवड झाल्यावर पंतप्रधान प्रथमच सर्व खासदारांना भेटणार आहेत. हॉटेल अशोका इथे होत असलेल्या पंतप्रधानांच्या मेजवानीचं निमंत्रण सर्व खासदारांना पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यातर्फे पाठवण्यात आलंय. सर्वपक्षीय बैठकीला बहुतांश विरोधी पक्षांनी दांडी मारल्यानंतर आता या मेजवानीला कितपत प्रतिसाद मिळेल याची शंकाच आहे.