प्रियंका गांधींना इतरांना मारहाण करण्याचा आजार-सुब्रमण्यम स्वामी

प्रियंका गांधींच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशानंतर राजकीय वर्तुळातून अनेक विवादास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत.

Updated: Jan 27, 2019, 01:34 PM IST
प्रियंका गांधींना इतरांना मारहाण करण्याचा आजार-सुब्रमण्यम स्वामी title=

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा सदस्य सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. सुब्रमणयम स्वामी यांनी 'एएनआय' या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना 'प्रियंका गांधी यांना एक आजार असून तो सामाजिक जीवनात अनुकूल तसेच योग्य नाही. त्यांना इतरांना मारहाण करण्याचा आजार आहे. या आजाराला बायपोलैरिटी म्हणतात. या आजारातून त्यांचे हिंसावादी चरित्र दिसून येते. प्रियंका गांधींच्या या आजाराबाबत जनतेला माहिती असले पाहिजे की, त्या स्वत:वरील संतुलन कधी गमावून बसतील, याबाबत कोणीही सांगू शकत नाही' असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी वाड्रा यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल काही दिवसांपूर्वीच अधिकृत घोषणा केली. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांच्यावर पूर्व उत्तरप्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रियंका गांधींच्या राजकारणातील सक्रीय प्रवेशाच्या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात त्यांच्याबद्दल अनेक विवादास्पद प्रतिक्रिया उमटत आहेत. 

याआधीही प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशानंतर भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी त्यांची तुलना करिना कपूर आणि सलमान खानसारख्या बॉलिवूड कलाकारांशी केली होती. तर दुसरीकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे मंत्री विनोद नारायण झा यांनी 'काँग्रेसच्या नवनिर्वाचित महासचिव प्रियंका गांधी वाड्रा अतिशय सुंदर आहेत आणि याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कोणताही गुण नाही. काँग्रेसने लक्षात ठेवले पाहिजे की, सुंदरतेमुळे मते मिळत नाही' असे वादग्रस्त विधान केले होते.