महत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी 'ही' सेवा बंद

Vande Bharat Packaged Food: ग्राहकांच्या तकारीनंतर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी महत्त्वाची सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 25, 2023, 12:46 PM IST
महत्त्वाची बातमी! ग्रहकांच्या तक्रारींनंतर वंदे भारतमध्ये पुढील सहा महिन्यांसाठी 'ही' सेवा बंद title=
Railways stops packaged foods sale in Vande Bharat trains for 6 months

Vande Bharat Packaged Food: वंदे भारतच्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची सुविधा पाहता येत्या 6 महिन्यांपर्यंत वंदे भारतमध्ये (Vande Bharat Train) पाकिटबंद जेवण देण्यात येणार नाही. रेल्वेने एक पत्रक जारी करत ही घोषणा केली आहे. रेल्वेने हा निर्णय प्रवाशांच्या तक्रारीनंतर आणि स्वच्छतेसाठी घेतला आहे. PAD ( बेकरी प्रोडक्ट, वेफर्स, कन्फेक्शरी आयटम, कोल्ड ड्रिंक्स इ) आणि अ ला कार्टे खाद्यपदार्थावर प्रवाशांच्या तक्रारी येत आहेत. 

वंदे भारत एक्स्प्रेसमधील खाद्यपदार्थांवर प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या. तसंच, हे खाद्यपदार्थ दरवाजाजवळ ठेवल्यामुळं आपोआप ट्रेनचे दरवाजे उघडत होते. ज्यामुळं प्रवाशांच्या अडचणीत वाढ होत होती. दरवाजांच्या आवाजामुळंही प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता. प्रवाशांच्या तक्रारीनंतर वंदे भारत ट्रेनमध्ये सहा महिन्यांसाठी पीएडी खाद्यपदार्थ आणि अ ला कार्टेची विक्री बंद करण्यात आली आहे. 

IRCTC ने रेल्वेला आदेश दिला आहे की, पाण्याची बोटल स्टॉक करु नये. जेव्हा गरज असेल तेव्हाच पाण्याच्या बाटल्या स्टोअर करा. कारण अधिक प्रमाणात पाण्याच्या बाटल्या स्टोअर केल्यास जागा जास्त प्रमाणात व्यापली जाते. त्यामुळं पाण्याच्या बाटल्या फक्त एकाच राउंड ट्रॅव्हलसाठी स्टॉक करण्यात याव्या. 

वंदे भारतमध्ये प्रवास करताना खानपान सेवांबाबत प्री-बुकिंग करावे लागेल. प्रवास सुरू करण्याच्या 24 ते 48 तास आधी प्रवाशांना पुन्हा एकदा मेसेज करण्यास येईल. ज्यांनी आधीपासूनच जेवणासाठीचे बुकिंग केले नाही त्यांनी ट्रेनमध्ये ऑर्डर दिल्यास आणि जेवण उपलब्ध असल्यास 50 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. तसंच, मेसेजद्वारे प्रवाशांना जेवण आणि जेवणाचे प्रमाणदेखील कळवले जाईल. 

वंदे भारतच्या प्रवाशांनी गाड्यांमधील जेवणाबाबत तक्रारी केल्या होत्या. मांसाहाराचे पैसे देऊनही नाश्त्यामध्ये शाकाहरी पदार्थ दिल्याची तक्रार अनेक प्रवाशांनी केली होती. मात्र, आता नवीन पद्धत राबवण्यात येणार असून यामुळं प्रवाशांना ते नेमके कशासाठी पैसे देत आहेत याची माहिती कळेल. 

सर्व विभागीय रेल्वेंना वंदे भारत गाड्यांमधील पॅन्ट्री सेवांबद्दल पहिल्या स्थानकांवर देण्यात येईल. तसेच प्रत्येक बोर्डिंग स्टेशनवर घोषणा करण्यास सांगण्यात आले आहे. प्रवाशांना थंडगार बाटलीबंद पाणी आणि गरम अन्न मिळावे यासाठी, प्रवास सुरू होण्यापूर्वी पॅन्ट्री उपकरणे कार्यरत असल्याची खात्री संबंधित विभाग करतील.