राजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य

 राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिकेवर आज निर्णय.

Updated: Jul 24, 2020, 11:12 AM IST
राजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य title=

मुंबई : राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात दाखल याचिकेवर राजस्थान उच्च न्यायालय आपला निर्णय देईल. गुरुवारी झालेल्या सुनावणीत सचिन पायलट गटातील पृथ्वीराज मीणा यांनी याचिका दाखल केली होती आणि केंद्र सरकारला या प्रकरणात पक्ष म्हणून घेण्याची मागणी केली होती. आज यावर निकला लागणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज विश्वासदर्शक ठरावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

 मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काल राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. मुख्यमंत्री गेहलोत यांचा दावा आहे की सरकारला कोणतीही अडचण नाही आणि ते लवकरच आपले बहुमत सिद्ध करेल. त्याचबरोबर पायलट गटाचा असा विश्वास आहे की सरकार अल्पमतात आहे आणि लवकरच पडेल. मुख्यमंत्री गेहलोत यांनी लवकरच विधानसभा अधिवेशन बोलावणार असल्याची माहिती दिली आहे. गेहलोत आणि पायलट गटामध्ये कायदेशीर लढाई सुरु असतानाच अशोक गेहलोत यांनी हे वक्तव्य केले आहे. 

दरम्यान, राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष जोशी यांनी केलेली मागणी फेटाळून लावली. त्यामुळे उच्च न्यायालयातील सुनावणीचा आणि निकालाचा मार्ग मोकळा झाला आहे.

अशोक गेहलोत यांच्या नेतृत्त्वातील सरकारने अधिवेशन बोलावले जर त्यामध्ये राज्य सरकार आपली बाजू किती भक्कम आहे हे दाखवू शकते, अशी सूत्रांची माहिती लआहे. तसेच या अधिवेशनाच्या निमित्ताने सचिन पायलट यांच्यासोबत केलेल्या बंडखोर आमदारांना अधिवेशनात सहभागी होण्यासाठी भाग पाडले जाऊ शकते, असे गेहलोत समर्थक गटाचे म्हणणे आहे. काँग्रेसने व्हीप दिल्यानंतरही आमदार हजर न राहिल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी योग्य कारण मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अधिवेशन घेण्यासाठी हालचाल करत असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसरीकडे सचिन पायलट यांना पक्षातून काढून टाकण्यात आलेले नाही. त्यामुळे ते अद्यापही काँग्रेसमध्ये आहेत. मात्र, त्यांना उपमुख्यमंत्री पदावरुन आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष पदावरुन काढून टाकण्यात आले आहे. सचिन पायलट यांच्यासोबत १८ आमदार आहेत. सचिन पायलट समर्थक आमदारांनी जयपूरमधील अधिवेशनात हजेरी लावल्यास त्यातील काही जणांचे मन वळविण्यात पक्ष श्रेष्ठी यशस्वी होतील आणि सचिन पायलट यांना मोठा शह मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.