लग्नाला जाण्याची इतकी घाई! 3 वर्षांच्या मुलीला आई-वडील कारमध्येच विसरले, 2 तासांनी लक्षात आलं, पण तोपर्यंत...

Shocking News: आई-वडीलांच्या निष्काळजीपणामुळे एका तीन वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. मुलीला कारमध्येच विसरुन करुन आई-वडील लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झाले. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत बराच वेळ झाला होता.

राजीव कासले | Updated: May 17, 2024, 08:18 PM IST
लग्नाला जाण्याची इतकी घाई! 3 वर्षांच्या मुलीला आई-वडील कारमध्येच विसरले, 2 तासांनी लक्षात आलं, पण तोपर्यंत... title=

Rajasthan News: आई-वडीलांच्या निष्काळजीपणामुळे एका तीन वर्षांच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. कारमध्ये गुदमरुन या मुलीचा मृत्यू झाला. एका लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आई-वडिल मुलीला कारमध्येच विसरुन गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. राजस्थानमधल्या कोटा इथंही ही दुर्देवी घटना घडली. (3-year-old girl dies of suffocation after getting locked in car)

काय आहे नेमकी घटना?
राजस्थानमधल्या कोटामध्ये  (Kota) राहाणारे प्रदीप नागर पत्नी आणि आणि दोन मुलींसह जोरावरपूरामधल्या एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. नागर कुटुंब आपल्या कारने कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले. आई एका मुलीला घेऊन कारमधून उतरली. तर प्रदीप नागर पार्किंग परिसरात कार पार्क करण्यासाठी गेला. तोपर्यंत आई आणि मोठी मुलगी लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी निघून गेल्या. या दरम्यान प्रदीपने पार्किंगमध्ये कार लावून ती लॉक केली आणि समारंभात सहभागी झाले. 

जवळपास दोन तास प्रदीप आणि त्याची पत्नी लग्न सोहळ्यात विविध लोकांशी गप्पा मारत होते, तसंच त्यांनी जेवणही केलं. दोन तासांनी पत्नीने लहान मुलगी कुठे आहे याबाबत पती प्रदीपकडे विचारणा केली. पण लहान मुलगी आपल्याबरोबर नसल्याचं त्याने सांगितलं. यानंतर दोघंही घाबरले आणि मुलीची शोधाशोध सुरु झाली. लग्न सोहळ्यात कोणाकडेच त्यांची लहान मुलगी दिसली नाही. शोधाशोध करत असताना सर्व जण पार्किंग परिसरात असलेल्या कारजवळ पोहोचले. यावेळी तीन वर्षांची गौरविका कारच्या मागच्या सीटवर बेशुद्ध अवस्थेत आढळली. 

कुटुंबियांनी मुलीला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. पण उपचाराआधीच मुलीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला. पण मुलीच्या आई-वडीलांनी मुलीच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम आणि पोलिसात तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

लहान मुलाचं अपहरण
दरम्यान, राजस्थानमध्ये आणखी एक घटना समोर आली आहे. झालावाड जिल्ह्यातील कामखेडा क्षेत्रातील नांदेडा गावात एका लग्न समारंभात सहभागी झालेल्या नऊ वर्षांच्या मुलाचं गावातल्याच एका तरुणाने अपहरण केलं. मुलाचं अपहरण करुन त्याच्या वडीलांकडून खंडणी मागण्याचा कट आरोपी तरुणाने रचला होता. यासाठी मुलाचं अपहरण करुन त्याला लांबच्या एका शेतात नेलं, मुलगा आरडा-ओरडा करु नये म्हणून आरोपी तरुणाने त्याला चाकूचा धाव दाखवून घाबरवलं. पण मुलाने धाडस दाखवत तिथून पळ काढला आणि कुटुंबियांना याची माहिती दिली. पोलीस तक्रारीनंतर आरोपी तरुणाला अटक करण्यात आली.