RBI Policy : बँकांना दिलासा पण सर्वसामान्यांचं काय? RBI च्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा होईल परिणाम?

RBI MPC Meeting: घराचा आणि कारचा थोडक्यात कर्जाचा हफ्ता वाढला की कमी झाला? आरबीआयकडून करण्यात आली बहुप्रतिक्षित घोषणा.     

सायली पाटील | Updated: Dec 6, 2024, 11:47 AM IST
RBI Policy : बँकांना दिलासा पण सर्वसामान्यांचं काय? RBI च्या निर्णयाचा तुमच्या EMI वर कसा होईल परिणाम? title=
RBI MPC Meeting interest rate governor shaktikanta announced update on repo rate

RBI MPC Meeting: भारतीय रिझर्व्ह बँक अर्थात आरबीआयच्या पतधोरण बैठकीतील अंतिम निर्णय आता जाहीर करण्यात आले असून, RBI च्या गव्हर्नरपदी असणाऱ्या शक्तिकांता दास यांनी काही गोष्टी पत्रकार परिषदेदरम्यान स्पष्ट केल्या.  (RBI Governor Shaktikanta Das) 

मागील काही द्वैमातिक आणि त्रैमासिक पतधोरण बैठकांदरम्यान देशातील सर्वोच्च बँक संस्था म्हणजेच आरबीआयकडून आतातरी रेपो रेटमध्ये बदल केले जावेत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. पण, यावेळीसुद्धा आरबीआयनं रेपो रेट स्थिर ठेवण्याचा निर्णय घेत त्यात कोणतेही बदल केलेले नाहीत. सध्याच्या घडीला रेपो रेट 6.50 टक्क्यांवर स्थिर असून, ही आकडेवारी बदलणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

पतधोरण बैठकीतील 6 पैकी 4 सदस्यांनी व्याजदरात बदल न करण्याची भूमिका घेतल्यामुळं हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयातून एक महत्त्वाची बाब स्पष्ट होतेय ती म्हणजे गृहकर्ज, वाहन कर्जासह इतर कैक प्रकारची कर्ज तूर्तास तरी स्वस्त होणार नाहीत. बँकांना दिलासा देत आरबीआयनं CRR 0.50 टक्क्यांनी कमी केला. बँका सामान्यांना कर्ज देताना जिथून कर्ज घेतात तिथं बँकांना लागणारा व्याजदर कमी करण्यात आला. तर, दुसरीकडे आरबीआयनं जीडीपी फोरकास्ट कमी केला. ही आकडेवारी यंदा 6.6 टक्के इतकी ठेवण्यात आली. 

 

2023 च्या फेब्रुवारी महिन्यात आरबीआयनं व्याजदरांमध्ये अंतिम बदल केले होते. जिथं हे दर 0.25 टक्क्यांवरून थेट 6.5 टक्के करण्यात आले होते. तेव्हापासून हे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, ही विद्यमान गव्हर्नर शक्तिकांता दास यांची अखेरची पतधोरण बैठक असून, 10 डिसेंबरला त्यांचा या पदासाठीचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. 

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्रात मोठा कार्यक्रम सुरु असताना ISRO ने इतिहास रचला! बाहुबली रॉकेटने लाँच केले सर्वात मोठे Proba-3 Mission

 

देशापुढं महागाईचा मोठा प्रश्न 

पतधोरण बैठकीतील ठळक मुद्दे मांडत असताना दास यांनी देशापुढं असणआऱ्या महागाईच्या आव्हानावरही कटाक्ष टाकला. आरबीआयच्या या पतधोरण बैठकीचा सामान्यांच्या जीवनावरही परिणाम होतो असं सांगताना महागाई दर नियंत्रणात ठेवणं हे आरबीआयचं प्राथमिक काम असल्याचं ते म्हणाले. देशापुढं महागाई हा चिंतेचा विषय असून, त्याचा थेट परिणाम GDP वर दिसून आल्याची बाब अधोरेखित करत जागतिक स्तरावरील घटनांचाही परिणाम महागाईवर होत असल्याचा मुद्दा त्यांनी प्रकाशात आणला.