RBI Penalty on ICICI and YES Bank: देशातील सर्व आर्थिक घडामोडींवर नजर ठेवून असणाऱ्या भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आता पुन्हा एकदा काही बड्या बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. प्राथमिक माहितीनुसार आरबीआयकडून आयसीआयसीआय आणि येस बँक अशा दोन खासगी क्षेत्रातील बँकांविरोधात ही कारवाई केली आहे. आरबीआयनं आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, ICICI वर 1 कोटी रुपये, तर येस बँकेवर 90 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण, आरबीआयनं ही कारवाई नेमकी का केली?
देशातील लहान आणि मोठ्या अशा सर्व श्रेणींमध्ये येणाऱ्या आर्थिक संस्थांच्या व्यवहारांवर नजर ठेवून असणाऱ्या आरबीआयकडून कोणत्याही संस्थेनं नियमांची पायमल्ली केल्यास कारवाईचं पाऊल उचललं जातं. अशाच कारवाईअंतर्गत आरबीआयनं दोन्ही बड्या बँकांवर मिळून 1 कोटी 90 लाख रुपयांची Penalty कारवाई केली आहे.
कार्यालयीन कामांमध्ये आणि अंतर्गत व्यवहारांमध्ये चुकीच्या पद्धतीनं सुरु असणारे सर्व व्यवहार पाहता आरबीआयनं कारवाईचा हा निर्णय घेतला. उपलब्ध माहितीनुसार आरबीआय बँकिंग नियमन अधिनियम 1949 अंतर्गत आयसीआयसीआय आणि येस बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे.
आरबीआयनं या मोठ्या बँकांवर ही कारवाई केलेली असतानाच बँकांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असला तरीही खातेधारकांवर मात्र या कारवाईचा कोणताही थेट परिणाम होणार नाही, असं सांगण्यात येत आहे. किंबहुना या दंडाच्या रकमेचा बँकांच्या दैनंदिन व्यवहारांमध्ये थेट हस्तक्षेप नसून, बँकांची कार्यपद्धती सुरळीत सुरू राहणार आहे. त्यामुळं पैशांच्या देवाणघेवाणीसमवेत कर्जाचे व्यवहार आणि इतरही तत्सम गोष्टी आणि सुविधांचा लाभ खातेधारकांना घेता येणार आहे. त्यामुळं या बँकांमध्ये तुमची खाती असतील तर चिंतेचं कारण नाही.
देशातील आणखी अनेक बँकांचे व्यवहारही आरबीआयनं विचारात घेण्यास सुरुवात केली असून, आता त्याचा खातेधारकांवर काही परिणाम होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.