सीआरपीएफच्या जवानांची कर्तव्यनिष्ठा; हल्ला होऊनही करतायत पाकिस्तानी उच्चायोगाचे रक्षण

पाकिस्तानी उच्चायोगाच्या इमारतीबाहेर शुक्रवारी अनेक लोक आंदोलन करण्यासाठी जमले होते.

Updated: Feb 15, 2019, 09:22 PM IST
सीआरपीएफच्या जवानांची कर्तव्यनिष्ठा; हल्ला होऊनही करतायत पाकिस्तानी उच्चायोगाचे रक्षण

नवी दिल्ली: पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) ४४ जवान शहीद झाले. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. यानंतर देशातील नागरिकांकडून मोठ्याप्रमाणावर संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीतही पाकिस्तानी उच्चायोगाच्या इमारतीबाहेर शुक्रवारी अनेक लोक आंदोलन करण्यासाठी जमले होते. यावेळी एक गोष्ट अनेकांच्या लक्षात आली. पाकिस्तानी उच्चायोगाच्या इमारतीचे रक्षण दुसरे तिसरे कोणी करत नसून सीआरपीएफचे जवानच करत आहेत. आपल्याच सहकाऱ्यांवर इतका भीषण हल्ला होऊनही हे जवान ज्या निष्ठेने आपले कर्तव्य बजावत होते, हे पाहून नक्कीच त्यांना सलाम करावासा वाटेल. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने येथील जवानांना पुलवामा हल्ल्याविषयी विचारले. तेव्हा या जवानांनी म्हटले की, आमच्या मनात कोणतीही भावना असो. पण आमच्यासाठी कर्तव्य हे सर्वोच्च आहे. त्यामुळे आम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवून जबाबदारी पार पाडावी लागते. आम्ही सैनिक आहोत आणि रक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे, असे या जवानांनी सांगितले. 

पुलवामातील अवंतीपूरा परिसरात गुरुवारी जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटके भरलेले वाहन घुसवून भीषण स्फोट घडवून आणला होता. या वाहनात तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटके भरली होती. त्यामुळे या स्फोटाची तीव्रता प्रचंड होती. यामध्ये सीआरपीएफच्या एका बसचे अक्षरश: तुकडे झाले. या बसमधील ४४ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर स्फोटात जखमी झालेल्या उर्वरित जवानांवर अजूनही उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे.