प्रणव मुखर्जींमुळे संघाच्या सदस्यत्व अर्जामध्ये तिप्पट वाढ - आरएसएस

यातील ४० टक्के अर्ज केवळ प्रणव मुखर्जी यांच्या गृह राज्यातील - पश्चिम बंगालमधून

Updated: Jun 26, 2018, 04:49 PM IST
प्रणव मुखर्जींमुळे संघाच्या सदस्यत्व अर्जामध्ये तिप्पट वाढ - आरएसएस

मुंबई : ७ जून रोजी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दीक्षांत समारंभात सहभागी झाले होते. हा कार्यक्रम नागपूरमध्ये पार पडला होता. यानंतर आता संघानं केलेल्या दाव्यानुसार, प्रणव यांना आमंत्रण दिल्यानंतर आणि त्यांच्या कार्यक्रमातील सहभागानंतर आरएसएसमध्ये सहभागी होणाऱ्या अर्जांत तब्बल तीन पटीनं वाढ झालीय. यातील ४० टक्के अर्ज केवळ प्रणव मुखर्जी यांच्या गृह राज्यातील - पश्चिम बंगालमधून आलेत.

'आरएसएस'चे ज्येष्ठ नेते बिप्लब रॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, '१ जून ते ६ जूनपर्यंत आरएसएसमध्ये सहभागी होण्यासाठी दररोज जवळपास ३७८ अर्ज दाखल झाले.... तर ७ जून रोजी प्रणव मुखर्जी यांच्या भाषणाच्या दिवशी जवळपास १७७९ अर्ज आले होते... यानंतर दररोज १२०० - १३०० अर्ज येतच आहेत'.

उल्लेखनीय म्हणजे, प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या मंचावर संघाचं नाव घेणं टाळलं होतं. उलट याच मंचावरून त्यांनी राष्ट्रीयत्व, राष्ट्रवाद आणि देशभक्तीवर आपली मतं मांडली होती. जवळपास ३० मिनिटांच्या भाषणा दरम्यान त्यांनी महात्मा गांधी, जवाहर लाल नेहरू, लोकमान्य टिळक, सुरेंद्र नाथ बॅनर्जी आणि सरदार पटेल यांच्या नावाचा उल्लेख केला होता. परंतु, संघाच्या कोणत्याही नेत्याच्या नावाचा उल्लेखदेखील त्यांच्या भाषणात नव्हता.