Saryu Express मध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचा Encounter; UP पोलिसांची धडक कारवाई

Saryu Express Encounter: ड्युटीसाठी निघालेल्या या महिला कॉन्स्टेबलशी वाद झाल्यानंतर तिला बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत तिला ट्रेनमधील सीट खाली ढकलून आरोपींनी पळ काढला होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 22, 2023, 11:48 AM IST
Saryu Express मध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्याचा Encounter; UP पोलिसांची धडक कारवाई title=
उत्तर प्रदेश पोलिसांची धडक कारवाई

Saryu Express Encounter: सरयू एक्सप्रेसमध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीमध्ये (एन्काऊंटर) ठार केलं आहे. आरोपीचं नाव अनीश खान असं आहे. उत्तर प्रदेशमधील स्पेशल टास्क फोर्स आणि अयोध्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली त्यामध्येच अनीश खान ठार झाला. या चकमकीमध्ये 3 पोलीस कर्मचारीही जखमी झाले. श्रावण महिन्यादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या यात्रेच्या कालावधीमध्ये सरयू एक्सप्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला झाला होता.

पोलिसांनी नक्की काय सांगितलं?

उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्स आणि अयोध्या पोलिसांच्या संयुक्त कारवाईमध्ये आरोपी अनीश खान ठार झाला. या घटनेनंतर पोलिसांनी काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही सांगितलं. पूरकलंदरमधील धतरिवा येथील रस्त्याजवळ ही चकमक झाली. या प्रकरणाची माहिती स्पेशल टास्क फोर्सचे प्रमुख अमिताभ यश यांनी लखनऊमध्ये बोलताना दिली आहे. उत्तर प्रदेशचे विशेष उपायुक्त (कायदा सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सरयू एक्सप्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करण्यात आल्याच्या घटनेतील मुख्य आरोपी अयोध्येमधील पूरा कलंदर येथे पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झाला.

1 लाखाचं होतं बक्षीस

अनीश खानच्या 2 साथीदारांना चकमकीनंतर इनायत नगरमधून अटक करण्यात आली आहे. पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीमध्ये आरोपी अनीश खान जखमी झाला होता. मात्र नंतर त्याचा मृत्यू झाला असं प्रशांत कुमार म्हणाले. तसेच त्याचे साथीदार आझाद आणि विशंभर दयाल दुबे जखमी झाले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सरयू एक्सप्रेसमध्ये महिला कॉन्स्टेबलवर हल्ला करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी 1 लाखाचं बक्षीस ठेवलं होतं. उत्तर प्रदेश एटीएशने या आरोपांसंदर्भात महिती देणाऱ्यांना 1 लाखाचं बक्षीस देण्याची घोषणा केली होती. यासाठी 3 मोबाईल नंबर देण्यात आले होते. 

नेमकं घडलं काय?

सोरांव येथे भदरी गावामध्ये राहणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल सुमित्रा पटेल मागील महिन्यामध्ये 30 ऑगस्ट रोजी फफामऊ येथे सरयू एक्सप्रेसमधून जात होत्या. त्या अयोध्येमधील हनुमानगढी येथे ड्युटीवर रुजू होण्यासाठी जात होत्या. मात्र त्याचवेळी मनकापूर ते अयोध्येदरम्यानच्या प्रवासात रात्री सीटवर बसण्याच्या वादावरुन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. सुमित्रा पटेल यांना बेदम मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत त्यांना ट्रेनच्या सीटखाली ढकलं आणि आरोपींनी ट्रेनमधून पळ काढला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतरच एकच खळबळ उडाली होती. सध्या सुमित्रा पटेल यांच्यावर लखनऊमधील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत.