एसबीआय खातेधारकांसाठी : या ४ नियमांमध्ये झाले बदल

एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

Updated: Oct 1, 2017, 09:36 PM IST
एसबीआय खातेधारकांसाठी : या ४ नियमांमध्ये झाले बदल  title=

मुंबई : एसबीआय बँकेच्या खातेधारकांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण देशातली सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयनं त्यांच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. १ ऑक्टोबर म्हणजेच आजपासून हे नवे नियम लागू झाले आहेत.

मिनीमम बॅलन्स लिमीटमध्ये कपात

एसबीआयनं बचत खात्यामधल्या मिनीमम बॅलन्स लिमीटमध्ये दोन हजार रुपयांनी घट केली आहे. आधी ५ हजार रुपये असणारी लिमीट आता ३ हजार रुपये असणार आहे.

या ६ बँकांचा चेक चालणार नाही

एसबीआयच्या पाच पूर्व सहयोगी बँक आणि भारतीय महिला बँकेचे चेक आता एसबीआय बँकेत स्वीकारले जाणार नाहीत. नवीन चेक बूकसाठी ग्राहकांनी इंटरनेट बॅकिंग, मोबाईल बॅकिंग, एटीएम किंवा जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन नव्या चेक बूकसाठी फॉर्म भरावा, अशी सूचना एसबीआयनं याआधीच दिली होती.

एसबीआयच्या पूर्व सहयोगी बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि भारतीय महिला बँकेचा समावेश आहे.

मिनीमम बॅलन्स न ठेवण्याचा दंडही कमी

एसबीआय खात्यामध्ये मिनीमम बॅलन्स ठेवला नाही तर दंडही कमी आकारण्यात येणार आहे. दंडाची ही रक्कम २० ते ५० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. अर्धशहरी आणि ग्रामीण भागामध्ये दंडाची रक्कम २० ते ४० रुपये असेल तर शहरी आणि महानगरांमध्ये ही रक्कम ३० ते ५० रुपये असेल.

खातं बंद करताना कोणतंही शुल्क नाही पण...

एसबीआयचं खातं बंद करताना ग्राहकाला याआधी शुल्क द्यावं लागत होतं पण आता खातं बंद करताना कोणतंही शुल्क घेतलं जाणार नाही. पण ही सुविधा खातं उघडल्यानंतर कमीत कमी १४ दिवसानंतर आणि एका वर्षानंतर खातं बंद केल्यानंतरच मिळणार आहे. १४ दिवसानंतर आणि एका वर्षाआधी खातं बंद केल्यानंतर ५०० रुपये आणि जीएसटी लागणार आहे.