अभिमानास्पद! जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर भारताला मोठं यश, सियाचीन ग्लेशियरमध्ये इंटरनेट सेवा सुरू

सियाचीन ग्लेशियरमध्ये तब्बल 19,061 फूट उंचीवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सक्रिय   

Updated: Sep 19, 2022, 05:22 PM IST
अभिमानास्पद! जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर भारताला मोठं यश, सियाचीन ग्लेशियरमध्ये इंटरनेट सेवा सुरू title=

Internet Service Activated on The Siachen Glacier : संपूर्ण देशाला अभिमान वाटेल असं यश भारताने मिळवलं आहे. जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून सियाचीन ग्लेशियर (Siachen Glacier) ओळखलं जातं. इथं माहितीची देवाणघेणाण करताना अनेक अडणींना सामोरं जावं लागत होतं. पण आता भारतीय सैन्याने (Indian Army) एक पाऊल पुढे टाकलं आहे. सियाचीन ग्लेशियरवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा (Satellite based internet service) सुरु करण्यात आली आहे.  18 सप्टेंबर 2022 रोजी म्हणजेच कालपासून इथं इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली.

सियाचीन ग्लेशियर ही जगातील सर्वात उंच युद्धभूमी असल्याचं मानलं जातं. इथं वर्षभर सरासरी तापमान उणे 20 अंशांपेक्षा कमी असतं. आणि हिवाळ्यात इथलं तापमान 50 अंशांपर्यंत खाली जातं.

आर्मीने शेअर केले फोटो
सियाचिन ग्लेशियरवर उपग्रह आधारीत इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या फायर अॅंड फ्युरी कॉर्प्सने ( Fire & Fury Corp) ट्विट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय, सियाचीन ग्लेशियरमध्ये 19,061 फूट उंचीवर उपग्रह आधारित इंटरनेट सेवा सक्रिय करण्याचं काम पूर्ण झालं आहे. सामरिक दृष्टीकोनातून भारतासाठी हे मोठं यश आहे. यामुळे भारतीय सैन्याला टेहाळणी आणि कम्युनिकेशनसाठी मोठी मदत होणार आहे. 

बीबीएलची इंटरनेट सेवा
कारगिर लेहमध्ये तैनात असलेली फायर अँड फ्युरी कॉर्प्स किंवा XIV कॉर्प्स सीमा सुरक्षेबरोबरच सियाचिन ग्लेशियरच्या सुरक्षेचीही काळजी घेतं. सियाचीनमध्ये भारत ब्रॉडबँड नेटवर्क लिमिटेड (BBNL) या भारत सरकारचा उपक्रम असलेल्या कंपनीने भारतीय सैन्याला इंटरनेट सेवा पुरवण्याचं काम केलं आहे. 

फायबर आधारित इंटरनेट कनेक्टिव्हिटी शक्य नसलेल्या सुमारे 7,000 ग्रामपंचायती आणि इतर दुर्गम भागात उपग्रह आधारित इंटरनेट पुरवण्याची BBNL ची योजना आहे. अहवालानुसार, देशभरात सुमारे 4,000 ग्रामपंचायतीमध्ये ही सेवा कार्यरत झाली आहे.