कोरियाच्या फर्स्ट लेडीनं जिंकलं संपूर्ण देशवासियांची मनं

एका परदेशी पाहुणीनं सगळ्यांचं लक्ष वेधलं

Updated: Nov 7, 2018, 08:10 PM IST
कोरियाच्या फर्स्ट लेडीनं जिंकलं संपूर्ण देशवासियांची मनं title=

वाराणसी : अयोध्येमध्ये काल झालेला दीपोत्सव अनेक अर्थांनी लक्षणीय ठरला. पण या सगळ्यात लक्ष वेधून घेतलं ते एका परदेशी पाहुणीनं. कोरियाच्या फर्स्ट लेडीनं अयोध्यावासीच नव्हे, तर संपूर्ण देशवासियांची मनं जिंकली आहेत.

किम जंग सुक. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जी इन यांच्या पत्नी अर्थात त्या देशाच्या फर्स्ट लेडी. मंगळवारी अयोध्येमध्ये झालेल्या दीपोत्सवासाठी त्या खास आल्या होत्या. अध्यक्षांच्या गैरहजेरीत किम जंग सुक यांचा हा पहिला विदेश दौरा. कोरियन द्विप आणि अयोध्या यांचं एक वेगळं नातं आहे. 

अयोध्येची राजकन्या सुरीरत्ना ही २ हजार वर्षांपूर्वी कोरियाला गेली आणि कोरियाचा राजा किम सुरो याच्याशी विवाह केला. कोरियन पुराणांमध्ये या कथेचा उल्लेख आहे. अर्थात, कोरियन पुराणांमध्ये तिचं नावराणी ह्यू वँग ओक असं आहे. या राणीशी आणि पर्यायानं अयोध्येशी आपली नाळ जोडणारे अनेक जण आजही कोरियात आहेत. या राणीच्या नावानं अयोध्येमध्ये एक पार्क आहे. या पार्कचं नूतनीकरण करण्यात येणार असून त्याचं उद्घाटन किम जंग सुक यांच्या हस्ते झालं. 

त्यानंतर राम कथा पार्कमध्ये दीपोत्सवाचा मुख्य सोहळा होता. या सोहळ्याला सुक भारतीय परंपरेत दिसल्या... आपल्या भाषणात त्यांनी भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. अत्यंत देखणी साडी परिधान केलेल्या सुक यांनी अयोध्यावासियांची मनं जिंकलीच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदीही याचं कौतूक केल्याशिवाय राहू शकले नाहीत.

कोरियाच्या फर्स्ट लेडी श्रीमती किम जंग सुक यांचा अयोध्या दौरा आणि त्यांनी परिधान केलेली पारंपारिक वस्त्रप्रावरणं ही आनंद आणि अभिमान देणारी बाब आहे. त्यांच्या या कृतीचं भारतीय नागरिकांना अतिशय कौतूक आहे. अशा शब्दांत पंतप्रधानांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

पारंपारिक वेषात शरयूची आरती केली. ३ लक्ष पणत्यांनी नदीकाठ उजळला असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह सुक यांनी नदीला दीपार्पणही केलं. अतिथी देवो भवं ही आपली परंपराच आहे. किम जंग सुक यांचा हा दौरा या परंपरेला साजेसा असाच झालाय. बुधवारी आग्र्याच्या ताजमहालास सुक यांनी भेट दिली आणि त्यानंतर मायदेशी प्रयाण केलं. या निमित्तानं दोन्ही देशांचे संबंध अधिक दृढ होण्यासही मदत झाली आहे.