श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील एका विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची बाब समोर आली आहे. या घटनेचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटी काश्मीरमध्ये दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला राज्यपाल एनएन. व्होरा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख उमर अब्दुल्लाही उपस्थित होते. मात्र, या समारंभादरम्यान राष्ट्रगीत सुरु असताना काही विद्यार्थी जागेवरच बसून राहिल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
भाजपाने या विद्यार्थ्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या विद्यार्थ्यांची पदवीच रद्द करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते कविंद्र गुप्ता यांनी केली.
यापूर्वीही काश्मीरमध्ये राष्ट्रगीताच्या अवमान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. त्यावेळीही राष्ट्रगीत सुरू असताना दालनातील अनेक लोक उभे नसल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे या इफ्तार पार्टीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, लष्करप्रमुखांसहित अनेक मान्यवर उपस्थित होते.
#CORRECTION: Some students of Central University of Kashmir stay seated during the Indian national anthem at convocation ceremony (4.07.18) https://t.co/6AFUwZKuE3
— ANI (@ANI) July 5, 2018