सुषमा स्वराज २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत

सुषमा स्वराज या २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत, या संदर्भात सुषमा स्वराज यांनी इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.

Updated: Nov 20, 2018, 03:52 PM IST
सुषमा स्वराज २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत title=

इंदूर : केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत, या संदर्भात सुषमा स्वराज यांनी इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. यावेळी बोलताना सुषमा स्वराज म्हणाल्या की, २०१९ ची लोकसभा निवडणूक मी न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुषमा स्वराज या मध्य प्रदेशमध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी इंदूरमध्ये आल्या आहेत, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. निवडणूक न लढवण्यामागचं कारण देताना सुषमा स्वराज म्हणाल्या, आरोग्याची काळजी घ्यायची असल्याने सुषमा स्वराज यांनी हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुषमा स्वराज सध्या ६६ वर्षांच्या आहेत.

सुषमा स्वराज त्यांच्या तब्येतीविषयी म्हणाल्या

सुषमा स्वराज म्हणाल्या, 'माझ्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली आहे. यामुळे डॉक्टरांनी मला धुळीमध्ये जाण्यास मनाई केली आहे. याच तब्येतीच्या कारणामुळे मी लोकसभा २०१९ ची निवडणूक लढवणार नाही.'

आता संसदेतलं सुषमांचं भाषण ऐकायला मिळणार नाही

सुषमा स्वराज या मध्य प्रदेशातील विदिशा मतदारसंघातून खासदार आहेत. सुषमा स्वराज या मुळच्या हरियाणातील अंबाला केंटच्या रहिवासी आहेत, पेशाने वकील असलेल्या सुषमा स्वराज नंतर राजकारणात आल्या. सुषमा यांचे वडील आरएसएसच्या प्रमुख सदस्यांपैकी एक होते. सुषमा स्वराज यांनी यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात सूचना आणि प्रसारण मंत्रिपदाचा पदभार सांभाळला होता.

सुषमा यांच्या एक सर्वोत्तम वक्ता म्हणून ओळख

एक उत्तम वक्त म्हणून सुषमा स्वराज यांची ओळख आहे, त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री देखील होत्या. सुषमा स्वराज यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात बेल्लारीहून निवडणूक लढवली आहे. मात्र सोनिया गांधी यांनी त्यावेळी सुषमा स्वराज यांना निवडणुकीत हरवलं होतं.

सुषमा स्वराज यांची संसदेतील भाषणं नेहमीच लोकप्रिय होत असत. सुषमा स्वराज अतिशय योग्य शब्दात संसदेतून विरोधकांवर हल्लाबोल करत असत. सध्याच्या मोदी सरकारमध्ये देखील सुषमा स्वराज यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचा पदभार आहे.

इंदूरमध्ये सुषमा स्वराज यांनी पत्रकारांसमोर काँग्रेसच्या घोषणापत्रावर जोरदार हल्ला केला. सुषमा यांनी म्हटलंय, 'काँग्रेसने घोषणापत्रात शेतकरी कर्ज माफी, बचत गटांना कर्जमाफीसारखे दिशाभूल करणारी आश्वासनं दिली आहेत. जनता यात अडकणार नाही. तसेच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लोकप्रियतेसमोर दिशाभूल करणारं राजकारण चालणार नाही.'