हा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का?

Video Telangana Policewoman Drags Student: या प्रकरणाचे राजकीय पडसाद राज्याच्या राजकारणामध्ये उमटू लागले असून विरोधी पक्ष नेत्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2024, 12:22 PM IST
हा Video पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! स्कुटरवरील महिला पोलिसांनी विद्यार्थिनीबरोबर काय केलं पाहिलं का? title=
हा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे

Video Telangana Policewoman Drags Student: तेलंगणमधून एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. एका विद्यार्थीनीचे केस पकडून तिला दुचाकीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी खेचत नेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. ही विद्यार्थिनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची सदस्या असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारविरुद्ध ही तरुणी आंदोलनामध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत हा प्रकार घडल्याचा दावा केला जात आहे. 

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, दुकाचीवर बसलेल्या 2 महिला पोलीस कर्मचारी या विद्यार्थिनीचा छळ करताना दिसत आहे. ही विद्यार्थिनी रस्त्यावरुन पळत असताना या पोलीस कर्मचारी तिच्या मागून दुचाकीवरुन येऊन तिचे केस पकडतात आणि तिला ओढत नेतात.

कशाविरुद्ध होतं आंदोलन?

तेलंगणमध्ये मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या एका निर्णयाविरुद्ध एबीव्हीपीकडून आंदोलन केलं जात होतं. तेलंगण राज्य कृषी विद्यापिठाचे प्राध्यापक जयशंकर यांना नवीन हायकोर्टाचा कॉम्प्लेक्स उभारण्यासाठी जमीन देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याला एबीपीव्हीचा विरोध आहे. याच आंदोलनामध्ये या महिला विद्यार्थिनीबरोबर हा प्रकार घडला.

विरोधी पक्षांचा संताप

या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने आणि भारत राष्ट्रीय समितीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आणि बालविकास विभागाने तसेच मानव आधिकार कमिशनने या प्रकरणामध्ये लक्ष घालवं अशी मागणी दोन्ही विरोधी पक्षांनी केली आहे.

स्मृती इराणींनाही केलं टॅग

विद्यार्थिनींना देण्यात आलेल्या या वागणुकीवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना भाजपाचे आंध्र प्रदेशमधील उपाध्यक्ष विष्णू रेड्डी यांनी, "मी या प्रकरणी दोषींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करत आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने यात लक्ष घालावं," असं म्हटलं आहे. यामध्ये त्यांनी केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणींनाही टॅग केलं आहे. 

पोलिसांनी माफी मागावी

"तेलंगण पोलिसांचा सहभाग असलेला नुकताच घडलेला प्रकार हा खरोखरच चिंताजनक आणि संतापजनक आहे," असं बीआरएसच्या नेत्या के. कविता यांनी म्हटलं आहे. कविता या तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत. "शांतते सुरु असलेल्या विद्यार्थिनींच्या आंदोलनामध्ये अशाप्रकारे एखादीला ओढत नेणं फारच चुकीचं आहे. पोलिसांकडून वापरल्या जाणाऱ्या या कठोर वागणुकीबद्दल नक्कीच विचार करण्याची गरज आहे. या क्रूर वागणुकीसाठी तेलंगण पोलिसांनी बिनशर्त माफी मागितली पाहिजे," असं कविता यांनी म्हटलं आहे. 

या प्रकरणात दोषींविरोधात कारवाई करावी असंही कविता यांनी म्हटलं आहे.