नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशभरात ई सिगरेट आणि ई हुक्कावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली असल्याची घोषणा केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर देशभरात ई-सिगरेट आणि ई-हुक्का बनवण्यासंबंधी उत्पादन, निर्मिती, आयात-निर्यात, विक्री, साठवण आणि जाहीरातींवर तात्काळपणे पूर्ण बंदी घालण्यात आली आहे.
आता ई-सिगरेट आणि ई हुक्काच्या वापरावर दंड आणि शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. पहिल्यांदा ई सिगरेट आणि ई हुक्काच्या वापरावर १ लाख रुपयांचा दंड किंवा १ वर्षांचा तुरुंगवास किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. दुसऱ्यांदा नियमांचे उल्लंघन केल्यास ५ लाख रुपयांचा दंड आणि ३ वर्षांचा कारावास किंवा दोन्ही अशी शिक्षा सुनावण्यात येऊ शकते.
सध्या, देशात १५० हून अधिक विविध फ्लेवरच्या ई-सिगारेट विकल्या जात आहेत. भारतात याची निर्मिती होत नाही. परंतु त्यांची आयात केली जाते. जवळपास ४०० ई-सिगरेट ब्रॅंड भारतात विकले जात आहेत.
ई-सिगारेटच्या सेवनामुळे वापरकर्त्याच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन जमा होते. तरुणांच्या स्वास्थ्यांवर होणारा नकारात्मक परिणाम, हेच या निर्णयामागचे कारण असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. तंबाखू, इलेक्ट्रॉनिक सिगरेट आणि इतर वेपिंग उपकरणे तरुणांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. लहान मुलांवरही याचा वाईट परिणाम होत असल्याचे निर्माला सीतारामन यांनी सांगितले.