बद्रीनाथ मंदिराची कवाडं पुढील ६ महिन्यांसाठी बंद

हा महिन्यांनंतर बद्रीनाथची कवाडं भक्तांसाठी खुली केली जाणार आहेत.

Updated: Nov 18, 2019, 10:22 AM IST
बद्रीनाथ मंदिराची कवाडं पुढील ६ महिन्यांसाठी बंद
फोटो सौजन्य : एएनआय

उत्तराखंड : बद्रीनाथ मंदिराची कवाडं संपूर्ण विधिवतरित्या पुढील ६ महिन्यांसाठी बंद करण्यात आली आहेत. रविवारी सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी बद्रीनाथ मंदिराची दारं बंद करण्यात आली. यावेळी आर्मी बँडच्या तालावर नाचत, गात शेकडो भक्तांनी भगवान बद्री विशाल यांना निरोप दिला.

कडाक्याच्या थंडीमुळे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भक्तांसाठी बद्रीनाथची दारं बंद केली जातात. त्यानंतर एप्रिल-मे महिन्यात पुन्हा उघडली जातात. हिमालयीन क्षेत्रातील तीन मंदिरं केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची दारं यापूर्वीच बंद केली गेली आहेत. आता बद्रीनाथ मंदिराची दारंदेखील बंद करण्याच आली आहेत.

बद्रीनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष मोहन प्रसाद थपलियाल यांनी दारं बंद होण्याबाबत सांगितलं की, थंडीमुळे मंदिराची दारं बंद करण्यात आली आहेत. हा अतिशय भावनिक क्षण आहे. आता देव-देवता भगवान बद्री यांची पूजा करतील. दारं बंद होण्यावेळी हजारो भाविक बद्रीनाथ धामला पोहचतात. दारं बंद होण्याच्या दिवशी सकाळपासून भक्तांची मोठी गर्दी होते. सायंकाळी ५ वाजून १३ मिनिटांनी माता लक्ष्मी भगवान बद्रीनाथ यांच्यासोबत विराजमान झाल्यानंतर, बद्रीनाथची दारं बंद करण्यात आली. आता सहा महिन्यांनंतर ग्रीष्ममध्ये बद्रीनाथची कवाडं भक्तांसाठी खुली केली जाणार आहेत.

  

यावर्षीदेखील बद्रीनाथ यात्रेने आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर्षी जवळपास १२ लाख २५ हजार भक्त यात्रेसाठी दाखल झाले होते.