तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा

Tirumala Tirupati Laddu Row: तिरुमाला तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडवांमध्ये प्राण्यांची चरबी असल्याचे आढळले होते. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 23, 2024, 08:40 AM IST
तिरुपतीच्या प्रसादाच्या लाडवांमध्ये प्राण्याची चरबी असल्याचा संशय कसा आला? मंदिर प्रशासनाकडून खुलासा title=
tirumala tirupathi devastanam ttd shamala rao reaction on tirupati laddu animal fat

Tirumala Tirupati Laddu Row: आंध्र प्रदेशच्या तिरुपती मंदिराच्या प्रसादात प्राण्यांची चरबी आणि फिश ऑइल सापडल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. प्रसादाच्या लाडवांमध्ये भेसळ असल्याचे समोर येताच ही हिंदूंच्या भावनांसोबत छेडछाड असल्याचा आरोप करण्यात येत आहे. मात्र तिरुपतीच्या प्रसादात भेसळ असलेले तूप वापरण्यात येते, याचा खुलासा कसा झाला हा सवाल उपस्थित होत आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD)ने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे. 

टीटीडीचे कार्यकारी अधिकारी जे श्यामल राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लाडूच्या दर्जावर चिंता व्यक्त केली होती. मंदिराची पावित्रता जपावी अशी त्यांची इच्छा होती. भगवान वेंकटेश्वर स्वामी यांना प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यामुळं कोणत्याही प्रकारची भेसळ त्या प्रसादाला अपवित्र करण्याचे कारण ठरू शकते. 

'टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामल राव  पुढं म्हटलं की, कार्यकाळ सांभाळल्यानंतर  जेव्हा तूपासाठी टेंडर जारी झाले तेव्हा ते पाहूनच थोडा संशय आला. इतक्या कमी पैशात गायीचं तूप शुद्ध कसं पुरवलं जातं. संशय निर्माण झाल्यानंतर त्या तुपाच्या शुद्धतेची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. टीटीडीजवळ प्रयोगशाळा नाहीये. त्यासाठी तूपाचे सँपल सरकारच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. जेव्हा त्याचे रिपोर्ट आले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढं म्हटलं की, टीटीडी बोर्डाने सर्व पुरवठादारांना इशारा दिला आहे की, प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आल्यावर तूप शुद्ध असल्याचे आढळले नाही तर त्यांना काळ्या यादित टाकण्यात येईल. 

मंदिराला तूप पुरवणाऱ्या पुरवठादारांनी अंतर्गंत भेसळ चाचणीची सुविधा नसल्याचा फायदा घेतला. निकृष्ट साहित्याचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टीटीडीचे कार्यकारी अधिकारी श्यामल राव यांनी पुढं म्हटलं की, मंदिर प्रशासन लाडूंमध्ये वापरण्यात येणाऱ्या घटकांच्या गुणवत्तेबाबत आता कठोर निर्णय नियमांचे पालन करत आहे. 

चार नमुन्यांच्या चाचणी अहवालात एकसारखेच परिणाम दिसून आले आहेत. त्यानंतर तूपाचा पुरवठा तातडीने बंद करण्यात आला असून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आम्ही जेव्हा तूपाचा दर्जा पाहिले तेव्हा सुरूवातीला ते तूप आहे की तेल हेच सांगू शकलो नाही. खासगी कंपनीने पुरवलले तुपाचे चार टँकर हे भेसळयुक्त असल्याचे आढळले. त्यानंतर त्याचे नमुने घेऊन ते लगेलचच तपासणीसाठी पाठवण्यात आले. 

राव यांनी पुढं म्हटलं आहे की, सुरुवातीला जरी ते तूप दिसत असले तरी ते तूप नव्हतं. प्रयोगशाळेत करण्यात आलेल्या चाचण्यांमधून समोर आले की त्या तूपात स्वयंपाकात वापरण्यात येणारी डुकराची चरबी वापरण्यात आली आहे. तूपात प्राण्यांची चरबी असल्याचेही समजतेय.