मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा! आता दर महिन्याला मिळणार भत्ता...

Unemployment : राज्यासह देशभरात बरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या लाटांमुळे तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने बरोजगारीचे सावट आणखी गडद झालं आहे. त्यामुळे अनेकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे

Updated: Jan 26, 2023, 07:15 PM IST
मुख्यमंत्र्यांची बेरोजगार तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा! आता दर महिन्याला मिळणार भत्ता... title=
(फोटो सौजन्य - Reuters)

Unemployment : देशभरात दिवसेंदिवस बेरोजगारांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे यामध्ये आणखी वाढ झाल्याने बेरोजगारी चिंता वाढली आहे. अशातच छत्तीगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh CM Bhupesh Baghel) यांनी मोठी घोषणा केली. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या छत्तीसगड (Chhattisgarh) विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ही घोषणा केली आहे. बेरोजगार तरुणांना पुढील आर्थिक वर्षापासून मासिक भत्ता (allowance for unemployed youth) दिला जाईल, असे मुख्यमंत्री बघेल यांनी गुरुवारी सांगितले आहे. 2018 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही काँग्रेस (Congress) पक्षाने हे आश्वासन दिले होते. त्यानतंर आता मुख्यमंत्री बघेल यांनी पुन्हा छत्तीगडच्या जनतेला यासाठी आश्वस्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी नेमकी काय घोषणा केली?

गुरुवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बस्तर जिल्हा मुख्यालय जगदलपूर येथील लालबाग परेड मैदानावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बघेल यांनी ही घोषणा केली आहे. "बेरोजगार तरुणांना पुढील आर्थिक वर्षापासून (2023-24) दर महिन्याला बेरोजगारी भत्ता दिला जाईल," असे मुख्यमंत्री बघेल म्हणाले. मात्र ही रक्कम किती असणार आहे याबाबत बघेल यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

आणखी काय घोषणा केल्या आहेत?

यासोबत जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री बघेल यांनी कुटिरोद्योगावर आधारित ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी राज्यात ग्रामीण उद्योग धोरण करण्याचीही घोषणा केली आहे. त्याचबरोबर रायपूर विमानतळाजवळ एरोसिटीची स्थापना, मजुरांसाठी गृहनिर्माण सहाय्य योजना आणि महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी योजनांसह इतर अनेक घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. तसेच छत्तीसगड इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी केलेल्या मजुरांना तीन वर्षांच्या कालावधीसाठी घरे बांधण्यासाठी 50,000 रुपये अनुदान दिले जाईल, असेही मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले.