UP Election 2022 : फक्त ३ मिनिट आणि 'तिला' मिळालं उमेदवारी तिकिट

उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात, पण या मुलीने फक्त ३ मिनिटात मिळवलं तिकिट

Updated: Jan 26, 2022, 08:50 PM IST
UP Election 2022 : फक्त ३ मिनिट आणि 'तिला' मिळालं उमेदवारी तिकिट title=

नवी दिल्ली : निवडणुकीच्या काळात  नेत्यांची अर्धी लढाई निवडणूक जिंकण्यासाठी असते, तर त्याआधी अर्धी लढाई तिकीट मिळवण्यासाठी असते. एकाच जागेवर एकाच पक्षाच्या अनेक उमेदवारांचा दावा असतो. मग उमेदवारी देण्यावरुन पक्षाचाही मोठा कस लागतो. अशा स्थितीत निवडणूक जिंकण्याची अधिक शक्यता असलेल्या उमेदवारावर पक्ष विश्वास दाखवतो. 

फतेहाबाद जागेची का होतेय चर्चा
उत्तर प्रदेशमध्ये (UP Election) सध्या निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. प्रत्येक पक्ष निवडणूक जिंकण्यासाठी जोर लावतोय. प्रत्येक जागा जिंकण्यासाठी रणनिती आखली जात आहे. अशात आग्रा जिल्ह्यातील फतेहाबद विधानसभेची जागा (Fatehabad Assembly Seat) सध्या चांगलीच चर्चेत आहे. याला कारणही तसंच आहे. कारण या जागेवर उमेदवार देण्यासाठी समाजवादी पार्टीला (Samajwadi Party) फक्त तीन मिनिटं लागली. या जागेवर सपाने रुपाली दीक्षित (Rupali Dikshit) यांना तिकिट दिलं आहे.

या जागेवर तिकिट मिळवण्यासाठी रुपाली दीक्षित यांना केवळ 3 मिनिटे लागली. त्यांनी जागेवर दावा करणाऱ्या इतर सर्व उमेदवारांना मागे टाकलं. रुपाली ही आग्राचे बाहुबली अशोक दीक्षित यांची मुलगी आहे. त्यांनी लंडनमधून एमबीएचे शिक्षण घेतलं, त्यानंतर दुबईच्या बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) नोकरी मिळाली आणि आता फतेहाबादची राजकीय भूमी जिंकण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.

अखिलेश अवघ्या 3 मिनिटांत सहमत 
फतेहाबाद विधानसभा जागेवर समाजवादी पक्षाने राजेश कुमार शर्मा यांना उमेदवारी दिली होती, मात्र ३६ तासांतच उमेदवार बदलून रुपाली दीक्षित यांना तिकीट देण्यात आलं. रुपाली दीक्षित यांना या तिकिटासाठी फारशी मेहनत घ्यावी लागली नाही आणि अवघ्या 3 मिनिटांत सपा सुप्रीमो अखिलेश यादव यांनी रुपाली यांचं तिकिट निश्चित केलं.

'या' कारणामुळे निवडणुकीच्या मैदानात
तिकिट मिळवण्यासाठी रुपाली यांनी केलेल्या युक्तिवादात भाजप उमेदवाराने कथितपणे तिच्या वडिलांचा आणि ठाकूर समुदायाचा अपमान करत असलेल्या व्हिडिओ क्लिपचा संदर्भ दिला. या अपमानाचा बदला घेण्याची इच्छा व्यक्त करताना तिने जातीवादावर विश्वास नसल्याचं सांगितलं.  सरकारी योजनांमध्ये गरिबांसाठी पारदर्शक आणि न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी निवडणुक लढवायची असल्याचं रुपाली यांनी सांगितलं.

रुपाली दीक्षित म्हणाल्या, 'मी सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. त्यांनी मला विचारलं तुला निवडणूक का लढवायची आहे. यावर भाजपचे उमेदवार छोटेलाल वर्मा यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मला निवडणूक लढवायची आहे, असं उत्तर दिल्याचं रुपाली यांनी म्हटलं. तसंच ही जागा जिंकण्याचं वचनही रुपाली यांनी अखिलेश यादव यांना दिलं.

हत्येप्रकरणी वडिलांसह कुटुंबातील ४ जण तुरुंगात
रुपालीच्या वडिलांसह त्यांच्या कुटुंबातील चार सदस्य एका खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. कुटुंबातील 4 सदस्यांना ही शिक्षा मिळाल्यानंतरच रूपाली 2016 मध्ये फतेहाबादला परतली. यानंतर तिने राजकारणात पाऊल ठेवलं आणि आता सपाच्या तिकिटावर फतेहाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. 

75 वर्षीय अशोक दीक्षित यांना 2015 मध्ये सरकारी शाळेतील शिक्षिका सुमन यादव यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं होते. 2007 साली घडलेले हे हत्याकांड चर्चेत होते, ज्यामध्ये दीक्षित कुटुंबातील 3 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती.