... तर तुमच्या घरचा सेट टॉप बॉक्स बंद केला जाऊ शकतो

टीव्ही बघणाऱ्या ग्राहकांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Updated: Jan 3, 2019, 04:27 PM IST
... तर तुमच्या घरचा सेट टॉप बॉक्स बंद केला जाऊ शकतो title=

मुंबई - दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या निर्देशांमुळे ग्राहकांना यापुढे केवळ त्यांना हव्या असलेल्या चॅनेल्सचेच पैसे द्यावे लागणार आहेत. केबलचालक आणि डीटीएच कंपन्यांकडून विविध पॅकेजच्या नावाखाली ग्राहकांकडून पैसे आकारले जातात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी ट्रायने नवीन निर्देश दिले आहेत. याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासून होणार आहे. त्याचबरोबर ज्या ग्राहकांनी अद्याप आपली केवायसी (नो युअर कस्टमर) प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांचे सेट टॉप बॉक्सच बंद करण्याची तयारी सध्या केबलचालकांकडून सुरू आहे. ट्रायच्या आदेशानुसारच ही कारवाई करण्यात येणार आहे. सध्या विविध केबलचालकांनी आपल्या ग्राहकांना एमएमएसच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली असून, लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना केली आहे. 

नियमानुसार, टीव्ही बघणाऱ्या ग्राहकांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकाला आपल्या ओळखीचा आणि राहण्याचा कोणत्याही एका पुराव्याची प्रत केबलचालकांकडे द्यावी लागेल. ३१ जानेवारीपर्यंत केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर एक फेब्रुवारीपासून त्या घरातील सेट टॉप बॉक्स बंद केले जातील. एक फेब्रुवारीपासूनच ट्रायच्या नव्या नियमांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. म्हणजे त्या दिवसापासून तुम्हाला हवी असलेल्या वाहिनीचेच पैसे द्यावे लागणार आहेत. 

केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करायची?
जवळपास सर्वच केबलचालकांनी आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडील सेट टॉप बॉक्सवर लिहिलेला vcno नंबर आणि तुमचा रजिस्टर्ड मोबाईल क्रमांक हे दोन्हीही केबलचालकाकडे देणे आवश्यक आहे. vcno हा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. यामुळे केबल ऑपरेटरला ग्राहकांची माहिती मिळवण्यास मदत होते.