नवी दिल्ली : दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त होणाऱ्या शासकीय कार्यक्रमांची तयारी सध्या दिल्लीच्या राजपथ परिसरात सुरु आहे. राजपथ येथे होणाऱ्या संचलनादरम्यान व्हीव्हीआयपी व्यक्तींची उपस्थिती पाहता त्यांच्या आणि या परिसराच्या संरक्षणासाठी पहिल्यांदाच सीआरपीएफच्या महिला तुकडीला तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच महिलांच्या पथकावर प्रजासत्ताक दिनी राजपथाच्या संरक्षणाची जबाबदारी असेल.
सीआरपीएफच्या महिलांचं एक पथक राजपथाचं संरक्षण करत असतानाच दुसरं पथक हे संचलनामध्येही सहभागी होणार आहे.
एकिकडे २६ जानेवारी या दिवशी देशवासियांची नजर ही राजपथावर होणाऱ्या शिस्तबद्ध संचलनावर असेल. तर, सीआरपीएफचं हे महिला पथक मात्र दुसरीकडे त्यांच्या कर्तव्याचं पालन करताना दिसणार आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणाऱ्या समारंभावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असेल. त्यामुळे या इशाऱ्याचा अंदाज घेत सतर्कतेची पावलंही संरक्षण यंत्रणांकडून उचलण्यात आली आहेत. ज्याअंतर्गत सुरक्षेच्या बाबतीच कोणताही हलगर्जीपणाही केला जात नाही आहे.
वाचा : सैन्य दिनाच्या संचलनाचं नेतृत्व करणाऱ्या तान्या शेरगिल यांचीच सर्वदूर चर्चा
सीआरपीएफच्या ज्या महिलांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे, त्यांना याविषयी प्रचंड अभिमान वाटत आहे. विविध राज्यांतून आलेलं हे महिलांचं पथक सध्या दिवसाचे चोवीस तास राजपथाच्या संरक्षणार्थ तैनात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या समारंभापूर्वीही या परिसरातील सुरक्षेचा आढावा घेण्याची या पथकाची जबाबदारी असते. शिवाय या दिवशी समारंभाला उपस्थिती लावणाऱ्या सर्व आमंत्रित शासकीय पाहुणे मंडळींच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा या पथकावर असते.
दरवर्षी, राजपथावरील संचलनासाठी आंतरराष्ट्रीय अतिथींची हजेरी असते. यंदा, हा मान ब्राझीलचे राष्ट्रपती जैर बोलसोनारो यांना देण्यात आला आहे. त्याशिवाय इतर देशांचे राजदूतही या समारंभाला हजर राहणार आहेत. त्यामुळे एकंदरच सीआरपीएफच्या महिला तुकडीवर एक मोठी जबाबदारी असणार आहे.