नवी दिल्ली - पुलवामातील अवंतीपोराजवळ दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गेल्या गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान शहीद झाले होते. अत्यंत भ्याडपणे करण्यात आलेल्या हल्ल्यात जवानांना प्राणांना मुकावे लागले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात दहशतवादी आणि दहशतवादाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज, १९ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता सर्व नागरिकांनी आपापल्या जागी दोन मिनिटे शांत उभे राहावे, असे आवाहन 'झी मीडिया कॉर्पोरेशन लिमिटेड'ने केले आहे.
देशावर संकट ओढवल्यानंतर सर्व देशबांधव एकजुटीने त्याचा प्रतिकार करण्यास सज्ज आहेत. यासाठी या श्रद्धांजलीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर या माध्यमातून देशातील सर्व नागरिक सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, हे सुद्धा दाखवून देण्यात येईल. सरकारने दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणीही यानिमित्ताने करण्यात येत आहे.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदच्या दहशतवद्यांनी गेल्या गुरुवारी अवंतीपोराजवळ केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला केला. स्फोटकांनी भरलेली गाडी जवान घेऊन निघालेल्या बसला धडकावून आत्मघाती स्फोट घडवून आणण्यात आला. या हल्ल्यामध्ये ४० जवानांना प्राणांना मुकावे लागले. भारतीय लष्कराच्या जवानांनी तातडीने कारवाई करीत या हल्ल्याचा सूत्रधार कामरान आणि गाझी या दोघांना सोमवारी कंठस्नान घातले. पण यावेळी झालेल्या चकमकीत भारताचे चार जवान शहीद झाले.
जवानांच्या अश्रूंचा एक थेंबही वाया जाऊ देणार नाही, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अवंतीपोरामधील हल्ल्यानंतर लगेचच केंद्र सरकारने पाकिस्तानला देण्यात आलेल्या 'मोस्ट फेवर्ड' राष्ट्राचा दर्जाही काढून घेतला आहे.