पुणे : एसएससी बोर्डाच्या परीक्षेत तब्बल १९३ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के मिळालेत. कारण गेल्या वर्षीपासून स्पोर्ट्स कोट्यासोबत कला आणि चित्रकला विषयाचे अतिरिक्त मार्क विद्यार्थ्यांना सरसकट देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला. त्यामुळे काही टक्यांनी कमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही १०० टक्के मिळालेत.
इतकच नाही तर यातील अनेक विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ५१० गुणांपर्यंत मजल मारलीय. विद्यार्थ्यांचे हे यश कौतुकास्पद असलं तरी राज्यातल्या शिक्षण मंडळाच्या परीक्षेच्या मुल्यांकन पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे. १०० टक्क्यांमुळे विद्यार्थ्यांना मिळालेला हा आत्मविश्वास त्यांच्या भविष्यासाठी फायदेशीर असला तरी तो पोकळ तर नाही ना ? याचाही विचार व्हायला हवा.
हे सगळं हास्यास्पद तर बनवत नाही आहोत ना? असा प्रश्नही उपस्थित होतोय. कला आणि क्रीडा हे दोन्ही विषय जरी महत्वाचे असले तरी त्याची गुणपद्धती कशी असायला हवी याचा विचार व्हायला नको का ? कला आणि क्रीडा याच्या जोरावर जर विज्ञान शाखेतील प्रवेश होणार असतील तर अधिकतर विद्यार्थ्यांसाठी ते आत्मविश्वास वाढवणारे असेल की कमी करणारे? असा सवालही आता विचारला जातोय.
कलेच्या गुणांचा लाभ राज्यातल्या ८१ हजार विद्यार्थ्यांना झालाय. तर क्रीडा गुणांचा लाभ ३९०३ विद्यार्थ्यांना झालाय. या अधिकच्या २५ गुणांमुळं ११ वीच्या प्रवेशावेळी इतर विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याची तक्रार अनेक पालकांनी केलीय.