कोरगाव भीमा दंगली प्रकरणी ४३ जणांना अटक, पीडित कुटुंबीयांना मदत

कोरेगांव भीमा हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत  एकूण  ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. 

Updated: Jan 9, 2018, 09:01 PM IST
कोरगाव भीमा दंगली प्रकरणी ४३ जणांना अटक, पीडित कुटुंबीयांना मदत

पुणे : कोरेगांव भीमा हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत  एकूण  ४३ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. 

राज्य शासनाकडून १० लाखांची मदत

हिंसाचारातील मयत राहुल फतांगडे यांच्या कुटुंबियास राज्य शासनाकडून १० लाखांची मदत केली आहे. मदतीचा चेक फतांगडे कुटुंबियाकडे सुपूर्त करण्यात आलाय.

दरम्यान, कोरेगाव-भीमा दंगलीवरून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानं डावे विरुद्ध उजवे संघर्षाला धार

कोरेगाव भीमा दंगलीची सुरूवात ज्या वढू गावातून झाली, तिथले वाद आधीच मिटले होते, अशी नवी धक्कादायक माहिती झी २४ तासच्या हाती आलीय. 

दंगल भडकवल्याची भावना

दंगलग्रस्त वढू गावात गेल्या ३१ डिसेंबरला दोन्ही गटांच्या गावक-यांची बैठक झाली. त्यामध्ये एकमेकांवर नोंदवलेले गुन्हे मागे घेण्याची तयारी दोन्ही बाजूंनी दाखवली. त्यांच्यामध्ये तसा रीतसर सामंजस्य करार देखील झाला. मात्र त्यानंतरही गैरसमजातून दंगल भडकल्याची भावना वढूतल्या गावकऱ्यांनी बोलून दाखवलीय. 

सणसवाडी गाव

पुणे अहमदनगर महामार्गावरचं सणसवाडी गाव. इथले गावकरी सध्या तणावाच्या वातावरणात जगतायेत. त्याला कारणही तसंच आहे. याच गावातील राहुल फटांगडे हा युवक कोरेगाव भीमा इथं दोन गटात झालेल्या दंगलीत नाहक बळी गेला. 

विजयस्तंभाला मानवंदना  

१ जानेवारीला कोरेगाव भीमा गावातल्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंची गर्दी जमली असताना दंगल उसळली. दोन्ही बाजूंनी जोरदार दगडफेक सुरू झाली. नेमका त्याचवेळी काही कामानिमित्त रस्त्यावर आलेल्या राहुलला दगड लागले. त्यात कोणत्याही गटाचा भाग नसलेल्या राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला.

राहुलचा हकनाक बळी

दंगलीशी त्याचा काहीही संबंध नसताना, राहुलचा हकनाक बळी गेला. त्याच्यामागे वृद्ध आई आणि भाऊ बहीण असं कुटुंब आहे. बहिणीचे लग्न झालंय.  लहान भाऊ पोलीस दलात कामाला आहे. मुख्यमंत्र्यांनी राहुलच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची मदत जाहीर केली हे त्यांना माध्यमांमधूनच कळलं. पण एवढा आघात होऊनही सरकारचा कुणीही प्रतिनिधी सांत्वनसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.हिंसेला कोणताही धर्म नसतो. जे काही कोरेगाव भीमामध्ये घडलं ते निश्चितच निषेधार्ह आहे. राहुलसारख्या निरपराध्यांचे बळी गेल्यानंतर तरी आपला समाज भानावर येणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.