वर्धा : हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव-दातार येथील शिवारात बुधवारी दुपारी आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळ दाखल झाले आहेत. मृत मोरांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
अहवाल आल्यावरच मोरांचा मृत्यू कशाने हे स्पष्ट होईल. नाल्याच्या बाजूला हे आठ मोर मृतावस्थेत आढळून आले आहेत. यामध्ये एक नर तर सात मादी असल्याचं वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सध्या बर्ड फ्ल्यूची साथ सुरू आहे. अशात आठ मोर मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
बर्ड फ्लू देशात पसरत आहे. आता महाराष्ट्रातही बर्ड फ्लूने दाखल झाला आहे. राज्यात दोन हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. राज्य सरकार सर्व आवश्यक खबरदारी घेत आहे.
महाराष्ट्रासह आतापर्यंत 8 राज्यांनी बर्ड फ्लूची पुष्टी केली आहे. केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढला आहे.