"मामा... ही आमची आई आहे...आमच्या आईच्या अस्थी परत मिळतील ना?" ८ वर्षाच्या मुलाची आईसाठी स्मशानात विनंती

कोरोनात माणुसकी मरतेय असं म्हटलं जातंय, पण ही घटना आम्ही तुम्हाला यासाठी सांगतोय की, कोरोनात माणुसकी जिवंत ठेवणारी उदाहरणं आहेत.

Updated: Apr 24, 2021, 07:18 PM IST
"मामा... ही आमची आई आहे...आमच्या आईच्या अस्थी परत मिळतील ना?" ८ वर्षाच्या मुलाची आईसाठी स्मशानात विनंती title=

पुणे : कोरोनात माणुसकी मरतेय असं म्हटलं जातंय, पण ही घटना आम्ही तुम्हाला यासाठी सांगतोय की, कोरोनात माणुसकी जिवंत ठेवणारी उदाहरणं आहेत. जी खूप भावनिक आहेत, आणि माणूस हा सर्वात जास्त भावनिक प्राणी आहे. ही घटना घाबरवण्यासाठी नाही. ही घटना पुण्यातील आहे. कदाचित कालपर्यंत स्मशान हे नाव काढलं तरी ते नाव संवादात पुन्हा येऊ नये म्हणून काळजी घेतली जायची. तेच स्मशान आता कोरोनाने घर-अंगणासारखं करुन ठेवलंय. 

पुण्यातल्या स्मशानातली घटना

प्रत्येक तिसऱ्या घराआड कोरोनाचा कोणत्यानं कोणत्या प्रकारे प्रत्येकाला फटका बसला आहे. पुण्यातल्या स्मशानातली ही गोष्ट आहे. कोरोना साथीच्या प्रकोपामुळे विद्यूत दाहिनीत नंबर लागून प्रेतं विद्यूत दाहिनीत टाकली जात आहेत. जे लोक प्रेत उचलून ते जाळण्यासाठी विद्यूत दाहिनीत टाकतात त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे.

जवळच्यांचा हुंदका, रडण्याचा ओरडण्याचा आवाज रोजचाच

कोरोनाचा प्रकोप वाढल्याने रोज येणारी प्रेतं वाढली आहेत. जवळच्यांचा हुंदका, रडण्याचा ओरडण्याचा आवाज रोजचाच झाला आहे. आम्ही पाषाण हृदयाचे झालो आहोत, लोकांचे रडण्याचे शब्द कानावर पडतात, पण आम्हाला काहीच वाटत नाही, आमच्यातली दयामाया संपलीय असं आम्हालाच वाटायला लागलंय. पण समोरचं कामंही वाढलंय. 

न विसरता दोन्ही हात जोडून शेवटचा नमस्कार

माणसं येतात रडतात, काळजाचा तुकडा आमच्यासारख्या निर्दयींकडे सोपवतात...शेवटची मुक्ती...शेवटची भेट...दाहिनीत पार्थिव जातं, तेव्हा रडताना न विसरता दोन्ही हात जोडून शेवटचा नमस्कार घेतात. हे दृश्य दर काही मिनिटांनी. 

दाहिनीची ती गरम हवा देखील नकोशी 

हे सुरुच असतं....हे कधी थांबणार आहे...माहित नाही, आम्हालाही हे नकोसं झालंय, हे आम्ही कुणाला सांगू आणि आम्हाला कोण विचारणार...आम्हाला विद्युत दाहिनीची ती गरम हवा देखील नकोशी झालीय.

एक महागडी गाडी स्मशानात आली

पण त्या दिवशी एक महागडी गाडी स्मशानात आली...एवढ्या गडबडीतही आम्हाला लक्ष द्यायला ती गाडी भाग पाडत होती...कोण गेलं असावं...गरीबाला खूप चिंता असते ना श्रीमंताची...कुणीतरी श्रीमंत असावा...पण येथे स्मशानात तर तशी कोणती कॅटेगरी नाही, सर्वांना एकच गावाला जायचंय...त्या गाडीतून गोंडस राजकुमारासारखी मुलं उतरली...लक्षात आलं थोड्या वेळाआधी महिलेचं पार्थिव आलंय.. ते पार्थिव आमच्याकडे आलं...तेव्हा ही मुलं डोळ्यात अश्रू साठवून आमच्याकडे येताना दिसली.

पाषाण झालेल्या आमच्या हृदयाला देखील पाझर फुटला

यात साधारण आठ वर्षांच्या मुलगा पुढे येऊन म्हणाला..." ही आमची आई आहे, आता आम्हाला कुणीच नाही, मामा.... आम्हाला आमच्या आईच्या अस्थी परत मिळतील ना?" हे बोलून ही लहान मुलं धाय मोकलून रडू लागली...या मुलांची ही स्थिती पाहून एवढ्या दिवसापासून पाषाण झालेल्या आमच्या हृदयाला देखील पाझर फुटला...आम्हालाही रडू आलं...पार्थिव ठेवणाऱ्यांनी आम्ही...त्या मुलांना कधी छातीशी लावलं हेच कळलं नाही.

लहान मुलांचे आईसाठीचे निष्पाप संवाद

गरीब श्रीमंताची दरी स्मशानात संपते, पण वेदना आणि भावनिकता संपत नाही, ही मुलं खूप रडली, त्यांना आम्ही शांत केलं...पाणी दिलं...रडू नका आम्ही तुम्हाला तुमच्या आईच्या अस्थी देऊ असंही सांगितलं...रडणारे, आक्रोश करणारे आवाज खूप कानावर येत होते. पण ते तेवढ्यापुरताच...पण या लहान मुलांचे आईसाठीचे निष्पाप संवाद कानात घुमतायत, त्यांचं रडणं हेलावून टाकणारं आहे. कुणाला परत आणण्याचा पर्याय या जगात कुणाकडेच नाही... या मुलांसाठी देखील नाही. या मुलांची आई एका मोठ्या उद्योजकाची मुलगी होती असं सांगतात.